कोरोनाबाधित रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कोरोना संसर्गातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील रोगप्रतिकारक घटक (प्लाझ्मा) देण्यात येतात. प्लाझ्मा दिल्याने कोविड रुग्ण लवकर बरे होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने अत्यवस्थ रुग्णांचाही मृत्यूचा धोका टाळता येतो.
कोविड रुग्णांना बरे होण्यास जादा वेळ लागल्यास रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडू नयेत, कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात राहावी व रुग्ण अत्यवस्थ होऊ नयेत यासाठी गतवर्षी आरोग्य वभागाने राज्यातील सर्व कोविड रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरू केली होती. प्लाझ्मा थेरपीसाठी मिरज सिव्हिल रक्तपेढीत रक्तघटक वेगळे करणारे ॲमिकस हे उपकरण आणण्यात आले. मिरज सिव्हिल रक्तपेढीत गतवर्षी २९ जून रोजी प्लाझ्मा संकलनाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यात हजारो रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. प्लाझ्मासाठी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, दोन महिन्यांत कोरोनामुक्त झालेल्या दहा ते बाराजणांनीच प्लाझ्मा दान केले. प्लाझ्मासाठी संबंधित रुग्णांनाही संपर्क साधण्यात आला. मात्र, भीतीपोटी व अन्य कारणाने प्लाझ्मा दान करण्यास कोरोनामुक्त येत नसल्याने प्लाझ्माचा तुटवडा निर्माण झाला. प्लाझ्मा दानास अल्प प्रतिसादामुळे व गंभीर रुग्णांना प्लाझ्माचा फारसा उपयोग होत नसल्याच्या कारणावरून प्लाझ्मा उपचार काही महिन्यातच बंद करण्यात आली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता पुन्हा प्लाझ्मा थेरपीबाबत रुग्णांकडून विचारणा होऊ लागली आहे. शासकीय कोविड रुग्णालयात प्लाझ्माचा वापर थांबविला तरी काही खासगी रुग्णालयांत प्लाझ्माचा वापर करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.