लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : काँग्रेस नेते मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत २५ देशांतील २ हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यात आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर, फिडे मास्टरांचाही समावेश होता. सर्वाधिक खेळाडूंचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी स्पर्धा ठरली असल्याचे आयोजक संतोष पाटील यांनी सांगितले.
मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त मदनभाऊ युवा मंच व संतोष पाटील यांच्या सहकार्याने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व बुद्धिबळपट्टू सीमा कठमाळे यांनी पटावरील चाल खेळून केली. यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक फिरोज पठाण, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, दीपक सूर्यवंशी, युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, माजी महापौर किशोर शहा यांच्यासह युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी २ हजार ७५८ खेळाडू पात्र ठरले होते. त्यापैकी २०९१ खेळाडूंनी ऑनलाईन स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. रशिया, युनाटेड किंगडम, जर्मनी, बांग्लादेश यांसह २५ देशांतील खेळाडूंनी भाग घेतला. यात १५ पेक्षा अधिक ग्रॅण्डमास्टर, १६ फिडेमास्टर, १७ चेसमास्टर, ११ आंतरराष्ट्रीय मास्टरही होते. या स्पर्धेचे रशियाहून ग्रॅण्डमास्टरांनी ऑनलाईन विश्लेषणही सुरू केले होते. हा सांगलीच्या बुद्धिबळासाठी आनंदाचा क्षण होता.
फोटो ओळी :
मदनभाऊ पाटील ऑनलाईन आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व बुद्धिबळपट्टू सीमा कठमाळे यांनी पटावरील चाल खेळून केले. यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संतोष पाटील, फिरोज पठाण, प्रशांत पाटील, दीपक सूर्यवंशी, आनंद लेंगरे, किशोर शहा उपस्थित होते.