मिरजेत टाकळी रस्त्यावर येथे असलेल्या शाळा क्रमांक ६ यासाठी जिल्हा सुधार समितीमार्फत पाठपुरावा केल्यानंतर शाळेचे बांधकाम मंजूर होऊन त्याचा कार्यारंभ आदेश १० डिसेंबर रोजी ओमकार चव्हाण या ठेकेदारास देण्यात आला. मात्र, शाळा इमारतीचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरू असून कामाचा फलक लावलेला नाही, कामावर अंदाजपत्रकाची प्रत उपलब्ध नाही, या कामाच्या फाइलची अधिकाऱ्यांकडे मागणी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. संबंधित कामाचा तांत्रिक आराखडा, मंजूर नकाशा उपलब्ध नसल्याचे संबंधित शाखा अभियंत्याकडून सांगण्यात आले. शाळा बांधताना कोणत्याही तांत्रिक बाबींची पूर्तता न करता विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा उद्योग महापालिका अधिकारी व कर्मचारी ठेकेदाराला हाताशी धरून करीत असल्याचा आरोप समितीने केला आहे.
याप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करून, शाळेचे बांधकाम करताना तांत्रिक बाबी व मजबुतीसाठी विशेष लक्ष देण्यात यावे. याबाबत दोषींवर सात दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन व कायदेशीर कारवाई करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सुधार समितीचे कार्याध्यक्ष ॲड अमित शिंदे, रोहित शिंदे, नितीन मोरे, जयंत जाधव, चंद्रकांत जाधव, युवराज नायकवडे, गौरव घाटगे, सागर माळी, सौरभ सुनके, अनिस आगा, रवींद्र ढोबळे यांनी उपायुक्तांना निवेदन दिले.