सांगली/कोल्हापूर : नागपंचमीसाठी प्रसिध्द असलेल्या बत्तीस शिराळा येथील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच नागपूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथील नागपंचमीचा उत्सव प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे. मात्र, या नागपंचमी उत्सवावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ९ नुसार बंदी घालण्यात आली आहे. या कायदया अतंर्गत कलम ११ व १२ मध्ये शैक्षणिक तथा वैज्ञानिक अपवाद ग्राहय मानले जात आहे. धैर्यशील माने हे हातकणंगले मतदार संघातून निवडून गेलेले खासदार आहेत. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हा त्यांच्या मतदारसंघातील तालुका आहे.साप हा शेतकऱ्यांंचा मित्र आहे. या भागामध्ये ९० टक्के लोक शेतकरी आहेत. या ठिकाणी कित्येक वषार्पासून नागाची पुजा केली जाते. ही उल्लेखनीय बाब लक्षात घेऊन सामाजिक, सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून नागपुजा करण्यासाठी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२, कलम ११ व १२ तथा राज्य घटना कलम २५ व २६ नुसार शिराळा ग्रामस्थांना सजीव नागपुजेचा अधिकार दयावा अशी मागणी नूतन खासदार धैर्यशील माने यांनी संसदेमध्ये केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली. यावेळी जावडेकर यांनी या विषयावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.