म्हैसाळ : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे संपूर्ण देश संकटाचा सामना करीत असताना याचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे मिरज तालुक्यातील अनेक मोठ्या गावात प्लाॅॅट खरेदीकडे ग्रामस्थांनी पाठ फिरवली आहे.
मिरज तालुक्यातील बेडग, आरग, म्हैसाळ, नरवाड, मालगाव, सुभाषनगर या मोठ्या गावात मोठ्या उद्योजक, बिल्डरांनी अनेक शेतीजमिनी विकत घेऊन मोठ्या प्रमाणावर प्लाॅॅटिंग पाडले आहेत. प्लाॅॅट खरेदीला गुंतवणूक म्हणूनही अनेक जण प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी-विक्री झाली. पण गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे प्लॉॅट खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातच ग्रामीण भागात शेतीत प्लाॅॅट पाडून ते गुंठेवारीप्रमाणे विक्री केली जाते. आता शासनाच्या नव्या आदेशानुसार गुंठेवारी खरेदीही बंदी असल्याने मध्यवर्गीय कुटुंबांचे हाल होत आहेत. या सर्वांचा फटका शेतजमिनीचे व्यवहार करणाऱ्या व्यवसायिकांवर येत आहे.