सांगली : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने येत्या २0 ते २२ सप्टेंबर या कालावधित सांगलीच्या भावे नाट्यगृहात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन पीएनजी महाकरंडक एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पीएनचीचे संचालक सिद्धार्थ गाडगीळ, स्पर्धा समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.ताम्हणकर म्हणाले की, या स्पर्धेची व्यापकता वाढली आहे. संपूर्ण राज्यभरातून आता महाविद्यालयीन स्तरवरील संघांना आम्ही निमंत्रीत करीत आहोत. एकांकिका बसविण्यासाठी महाविद्यालयांना, विद्यार्थ्यांना आर्थिक कसरत करावी लागते. त्यामुळे एकांकिका सादर करणाऱ्या प्रत्येक संघाला २ हजार रुपये निर्मिती खर्च दिला जाणार आहे.स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघास १५ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व फिरता करंडक दिला जाणार आहे. दुसऱ्या क्रमांकास १२ हजार तर तिसऱ्या क्रमांकास १0 हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.
त्याचबरोबरच उत्कृष्ट दिग्दर्शन, स्त्री-पुरुष अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत अशा वैयक्तिक स्वरुपाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास अनुक्रमे दीड हजार, एक हजार व पाचशे रुपयांचे बक्षिस देण्यात येईल. सर्व सहभागी कलावंतांना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.स्पर्धेसाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी सांगली, कराड, इचलकरंजी, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी, बेळगाव याठिकाणच्या पीएनजीच्या शोरुम्समध्ये येत्या १३ सप्टेंबरअखेर प्रवेशिका जमा कराव्यात. सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहातही प्रवेशिका जमा करून घेतल्या जाणार आहेत.
सहभागी महाविद्यालयाने यासाठी सर्व पूर्ततेसह प्रवेशिका सादर कराव्यात. गेल्या काही वर्षात या महाकरंडक स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभत आहे. यंदाही राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर संघ सहभागी होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. यावेळी श्रीनिवास जरंडीकर, भालचंद्र चितळे, सनित कुलकर्णी आदी उपस्थित होते.