कडेगाव येथील अंधकवी चंद्रकांत देशमुखे तथा बाबूजी यांचे नुकतेच निधन झाले. राज्यातील विविध मान्यवर साहित्यिकांनी बाबूजी हे कविता आणि माणसांवर प्रेम करणारे कवी होते, त्यांनी दिलेला चारित्र्याचा गंध जपून ठेवावा, अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहिली.
खानापूर-कडेगाव साहित्य परिषद, ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ (बलवडी, भा.), यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रबोधिनी (देवराष्ट्रे) या संस्थांच्यावतीने बाबूजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाईन शोकसभा झाली. यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, बेळगाव, बीड आदी जिल्ह्यांतील साहित्यिक सहभागी झाले होते.
बेळगाव येथील राणी चन्नमा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. विनोद गायकवाड म्हणाले, कवितासंग्रह नसतानाही बाबूजी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात प्रसिध्द होते. आधुनिक काळातील ते संत होते.
प्रा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, बाबूजी मराठीतील राष्ट्रीय पातळीवरील कवी होते.
प्रा. डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, ते काळजाला भिडणारे कवी होते. प्रभाकर साळेगावकर (माजलगाव) म्हणाले, माणसे जोडणे हा बाबूजींच्या जगण्याचा स्थायीभाव होता. त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावा.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा बाबूजींचे साहित्य प्रकाशित करण्याची जबाबदारी उचलणार असल्याचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी सांगितले.
डॉ. पतंगराव कदम, मोहनराव कदम यांच्याशी बाबूजींचे जिव्हाळ्याचे संबंध होते. माझ्या आयुष्यातला चांगला मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त करतानाच जितेश कदम भावुक झाले.
डॉ. रामचंद्र देखणे, ॲड. सुभाष पाटील, रघुराज मेटकरी, प्रा. विश्वनाथ गायकवाड, सत्यप्रेम लगड (परळी ), भीमराव धुळूबुळू, दयासागर बन्ने, बाबा परीट, संदीप नाझरे, बाबा परीट, संदीप नाझरे, अभिजित पाटील, समाधान पोरे, रमजान मुल्ला, हिंमत पाटील, धर्मेंद्र पवार, विजय मांडके, संपत मोरे, सुनंदा शेळके, नीलम माणगावे, निलांबरी शिर्के आदींनी श्रद्धांजली वाहिली.
सतीश लोखंडे, दीपक पवार, दत्तात्रय सपकाळ यांनी संयोजन केले.
चौकट :
बाबूजींचा कवितासंग्रह दमसा प्रकाशित करणार
अंधकवी चंद्रकांत देशमुखे यांचा कवितासंग्रह प्रकाशित करण्याची जबाबदारी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा उचलणार असल्याचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी घोषित केले.