अर्जुन कर्पे --कवठेमहांकाळ --संपूर्ण देशात आणि राज्यात आपल्या कवितांनी हशा पिकविणाऱ्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या साक्षीने आपल्या जन्मभूमीतही आपल्या कवितांनी हशा पिकविला. हशा पिकविताना आठवले यांनी आपल्या कवितेला सामाजिक बांधिलकीची किनार असल्याचेही यावेळी नमूद केले. यामुळेच उपस्थितांची मनेही त्यांनी जिंकली. तालुक्याची विकास कामे पूर्ण करणार असल्याचे सांगताना, यावर ‘कवठेमहांकाळची फारच चांगली आहे हवा, इतिहास घडवायचा आहे मला नवा’ अशीही कविता त्यांनी केली. ‘या तालुक्याशी जोडली गेली आहे माझी नाळ, कारण माझा तालुका आहे कवठेमहांकाळ, मी तर आहे माझ्या भीमाचा बाळ, म्हणून मी उपसून टाकतो विषमतेच्या नदीतला गाळ, मी कुणावरही घेणार नाही आळ, पण दिल्लीला जाऊन उठविणार आहे जाळ.’ ही कविता म्हणताना आठवले यांनी दिल्लीमधून या स्वत:च्या तालुक्यासाठी निधी खेचून आणणार असल्याचे सांगितले.शनिवारी संपूर्ण तालुकाच आठवलेंच्या प्रतीक्षेत होता. आठवलेंच्या आगमनाने तालुका आठवलेमय तर झालाच, पण त्यांच्या कवितांनीही तालुका आठवलेमय झाला. त्यांच्या कवितांनंतर संपूर्ण तालुक्यात गावा-गावातल्या कट्ट्यावर आठवलेंच्या कवितांचीच चर्चा रंगली. तसेच काही युवकांनी या कविता सोशल मीडियावर टाकून मीडियाही आठवलेमय करून टाकला.आपल्या जन्मभूमीत आठवलेंनी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, दीपकबाबा शिंदे, भाजप, आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने कविता सादर करून, आपल्या कवितांचा मोठा चाहतावर्गही यावेळी निर्माण केला. ढालेवाडी आहे गाव...आठवले यांनी आपली ओळख करून देताना ‘जर तुम्ही टाकणार असाल माझ्यासमोर डाव, तर तुमच्यावरच घालतो मी घाव, कारण आठवले आहे माझे नाव आणि ढालेवाडी आहे माझे गाव’ या अशा कवितांनी हशा पिकला. यावेळी उपस्थितांनी आठवलेंच्या नावाने घोषणाही दिल्या.
कवठेमहांकाळ दौऱ्यात आठवलेंचे काव्य चर्चेत
By admin | Published: September 06, 2016 1:31 AM