गोटखिंडी : पोखर्णी (ता. वाळवा) येथील क्रशर रोडजवळील शामराव महादेव पाटील यांच्या वस्तीवरील शेळ्यांवर बिबट्याने रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. यात दोन शेळ्या दगावल्या, तर एक कोकरु गायब आहे. या घटनेमुळे पोखर्णी व परिसरातील ग्रामस्थांतून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी वैद्यकीय अधिकारी, वन अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.पोखर्णी येथील संतोषगिरी डोंगर परिसरात असणाऱ्या क्र शर रस्त्यावरील वस्तीवर शामराव पाटील व पत्नी हे वृध्द दाम्पत्य राहते. त्यांच्या वस्तीवरील शेडमध्ये शेळी, एक पाट, एक लहान कोकरु बांधलेले होते. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री हे दाम्पत्य झोपले. रात्री ११ च्या सुमारास बाहेर शेळ््यांच्या ओरडण्याच्या आवाजाने ते जागे झाले.
यावेळी पाटील यांनी बॅटरीच्या प्रकाशझोतात बाहेर पाहिले असता, त्यांना बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या तेथील लहान कोकरु घेऊन बाजूच्या शेतात पळून गेला, तर या हल्ल्यात दोन शेळ्या दगावल्या. घटनेचा पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी, वन अधिकारी यांनी केला असून, यात पाटील यांचे १७ हजाराचे नुकसान झाले आहे.