दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणारे दुकानदार, बसस्थानक परिसरातील फळ विक्रेते व पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या विक्रेत्यांवर आटपाडी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
दिघंची परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून दिघंचीमधील बेफिकीर दुकानदार दुकाने सुरू ठेवून गर्दी करत असल्याने पोलिसांनी दहा दुकानदारांकडून पाच हजार रुपये दंड वसूल केला. ही कारवाई सुरू होताच अर्धे शटर उघडून सुरू असलेली दुकाने झटपट बंद करून दुकानदार गायब झाले. पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, नितीन मोरे, संतोष जाधव आदींनी कारवाई केली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोलिसांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. दिघंचीमधील नागरिकांनी व दुकानदारांनी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. शासकीय नियमांचे उल्लंघन करू नये व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी केले आहे.