सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू असतानाही त्यात बेकायदेशीरपणे दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी आता कडक कारवाई सुरू केली आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध पोलीस पथकांनी पाच ठिकाणी कारवाई करत आठ जणांना अटक केली, तर ९२ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संचारबंदीमध्येही अवैधरीत्या दारूविक्रीवर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पथके तयार केली आहेत. या पथकांनी मिरज तालुक्यातील खटाव येथे छापा टाकून ५७ हजार ७०० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला. दारूविक्री करणाऱ्या संशयितांवर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, संजय कांबळे, सुधीर गोरे, प्रशांत माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनीही कारवाई करून ९२ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.