सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येने लाखाचा टप्पा पार केल्याने जिल्ह्यातील स्थिती अधिक चिंताजनक आहे. अशा स्थितीतही संचारबंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळविले आहे. गेल्या वर्षी ३७० जण बाधित आढळले होते, तर यंदा आतापर्यंत ४८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. योग्य आहार, व्यायामास प्राधान्य दिल्याने खाकीने कोरोनाशीही दोन हात करत त्यास थोपवले आहे.
नेहमीच बंदोबस्त आणि कामात असलेल्या पाेलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पोलिसांची नियमित आरोग्य तपासणी, त्रास झाल्यास तातडीने उपचार याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या मानाने जिल्हा पोलीस दलातील बाधितांचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी सहा पोलिसांचा मृत्यू झाला होता तर यंदा एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
पाेलीस मुख्यालयात असलेल्या देवगिरी या अधिकाऱ्यांसाठीच्या निवासस्थानात विलगीकरण कक्ष करण्यात आला आहे. याठिकाणी दाखल कर्मचाऱ्यांना सर्व सोयी करण्यात आल्या आहेत.
चौकट
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पूरक आहार
कोरोनाची बाधा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लक्षणे नसल्यास विलगीकरण कक्षात अथवा होम आयसोलेशनमध्येच राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करूनच याबाबत निर्णय घेतला जातो. पोलिसांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहार दिला जातो. पोलीस मुख्यालयातील कॅन्टीनमधून या कर्मचाऱ्यांसाठी पौष्टिक आहाराची सोय करण्यात आली आहे. दूध, फळे, अंडी यांसह इतर पदार्थांचा यात समावेश असतो.
चौकट
लसीकरणातही आघाडी
पोलिसांना ‘फ्रंटलाईन वर्कर’चा दर्जा असल्याने त्यांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणास प्रारंभ झाल्यापासूनच अधीक्षक गेडाम यांनी तातडीने लसीकरण करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचेही योग्य नियोजन झाल्याने सध्या राज्यात सर्वाधिक लसीकरणात सांगलीची आघाडी कायम आहे. जिल्ह्यातील ८७ टक्के पोलिसांनी लसीचा पहिला डोस घेतला असून, ८१ टक्के जणांनी दुसरा डोस घेत लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
कोट
पोलिसांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातात. तरीही बाधा झाल्यास त्यास तातडीने विलगीकरणात ठेवले जाते. उपचाराची सोय असल्याने कर्मचाऱ्यांना वेळेत उपचार मिळत आहेत. बाधितांना तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार दिले जात आहेत.
- संजय क्षीरसागर, सहायक पाेलीस निरीक्षक
चौकट
पहिली लाट
एकूण रुग्ण ४७,६१२
पोलीस ३७०
एकूण मृत्यू १७३३
पोलीस मृत्यू ६
दुसरी लाट
एकूण रुग्ण ५६,५९५
पाेलीस ४८
एकूण मृत्यू १३१३
पोलीस मृत्यू १