सांगली : तुपारी (ता. पलूस) येथील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार शुक्रराज घाडगे यास पकडण्यास गेलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षकांसह दोघे जखमी झाले. माधवनगर (ता. मिरज) येथील रविवार पेठेत शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्योती शुक्रराज घाडगे (तुपारी), कमल गोसावी, शशिकांत माळी, दीपक शशिकांत माळी व मंगेश गोसावी (रविवार पेठ, माधवनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. जखमी झालेले सहायक पोलीस निरीक्षक विशाल विलास पाटील (वय ३५) व पोलीस नाईक चेतन गजानन महाजन (३२, दोघे रा. विश्रामबाग) यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. ते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्तीस आहेत. या घटनेनंतर रविवार पेठेत तणाव निर्माण झाला होता. पथकाला हल्ला झाल्याचे समजताच पोलिसांचा जादा बंदोबस्त या ठिकाणी पाठविण्यात आला. तोपर्यंत संशयित पसार झाले.शुक्रराज घाडगे याच्याविरुद्ध चोरीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सांगली व सातारा पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यात तो गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. तो माधवनगरमध्ये आश्रयाला असल्याची माहिती मिळताच सहायक निरीक्षक विशाल पाटील यांचे पथक त्याला पकडण्यासाठी शनिवारी रात्री गेले होते. त्यावेळी संशयितांनी बेकायदा जमाव जमवून पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून धक्काबुक्की केली. पाटील यांच्यासह चेतन महाजन यांच्या हाताचा चावा घेऊन पलायन केले.पोलिसाची फिर्यादबेकायदा जमाव जमविणे, धक्काबुक्की व शासकीय कामात अडथळा आणल्या-प्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चेतन महाजन यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब बुधावले तपास करीत आहेत. दुपारी संजयनगर पोलीस शोधासाठी गेले होते; पण कोणीच सापडले नाही.
माधवनगरमध्ये पोलिसांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:01 AM