कवठेमहांकाळ : बसाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील श्रीकांत कुंडलिक माळी (वय २५) या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. इरळीतील माळरानावर त्याचा रविवारी मृतदेह आढळून आला. श्रीकांतला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.विहिरीवरील इलेक्ट्रीक मोटार चोरीप्रकरणी श्रीकांतला कवठेमहांकाळ पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते. त्याच्याविरुद्ध निनावी अर्ज आला होता. शनिवारी सकाळी पोलिसांनी खासगी वाहनातून त्याला पोलीस ठाण्यात आणले होते. सायंकाळी सहा वाजता चौकशीकरुन त्याला बसाप्पाचीवाडीचे सरपंच बाळासाहेब जानकर व अन्य नातेवाईकासोबत सोडून दिले होते. घरी गेल्यानंतर त्याने घरच्यांना पोलीस ठाण्यात घडलेली घटना सांगितली व रविवारी तो आठ वाजता घरातून बाहेर पडला. काही तासातच श्रीकांत हा इरळीच्या माळरानावर मृतावस्थेत आढळून आला. नातेवाईकही तेथे दाखल झाले. त्यांनी निवासी नायब तहसीलदार प्रकाश कोकाटे आल्याशिवाय पोलिसांना पंचनामा करु दिला नाही.पंचनामा करताना श्रीकांतच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या. हे पाहून नातेवाईकांनी श्रीकांतचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच झाल्याचा आरोप केला. मारहाण करणाºया पोलिसांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला. मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृतदेह विच्छेदन तपासणीसाठी हलविण्यात आला. श्रीकांतच्या घरची परिस्थती हलाखीची आहे. पण तो चोरी करु शकत नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेताना त्याच्या आईलाही दमबाजी केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्याच्या पश्चात आई, भाऊ व भावजय असा परिवार आहे.पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांनी घटनास्थळी भेट दिली. ते म्हणाले, श्रीकांतचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.अरविंद व राकेशच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. दोघांच्याही घरची परिस्थिती गरिबीची आहे.श्रीकांतची आत्महत्या : पोलिसांचा संशयश्रीकांतला निनावी अर्जावरून चौकशीसाठी बोलाविले होते. विहिरीवरील मोटार चोरीबाबत त्याची चौकशी सुरू होती. त्याच्याकडे दोन मोटारी सापडल्या. त्यापैकी एका मोटारीची त्याच्याकडे खरेदीची पावती होती. दुसºया मोटारीची पावती नव्हती. चौकशीदरम्यान तेथे सरपंच बाळासाहेब जानकर आले. त्यांनी, हा आमचा गावपातळीवरचा विषय आहे, आम्ही चौकशी करून सोमवारी येतो, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी श्रीकांतला जानकर यांच्यासोबत शनिवारीच सोडून दिले होते. दरम्यान, इरळीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या नाका, तोंडातून फेस आला होता. यावरुन त्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर, घरात विषारी द्रव्याची बाटली आढळून आली. त्याला मारहाण केली नाही, असा दावाही पोलिसांनी केला आहे.पोलिसांविरुद्ध आंदोलनसांगलीतील अनिकेत कोथळे घटनेची ही पुनरावृत्ती असून, ती मानवतेला काळिमा फासणारी आहे. माळी समाजाने या घटनेचा निषेध व्यक्त केला. माळी समाज कवठेमहांकाळमध्ये आज, सोमवारी एकत्रित जमून दोषी पोलिसांवर कारवाईसाठी आंदोलन करणार आहे, अशी माहिती विद्रोही व बहुजन समाजाचे नेते नामदेव करगणे यांनी दिली.
पोलिसांच्या मारहाणीत इरळीतील तरुणाचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:03 AM