इस्लामपूर : परमिट रूम बिअरबारच्या परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शहाजी आबा पाटील (वय ५६) असे या निरीक्षकाचे नाव आहे.
कासेगाव (ता. वाळवा) येथील तक्रारदाराच्या परमिट रूम बिअरबारच्या परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी पाटील याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. सांगली जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा केल्यावर मंगळवारी दुपारी प्रशासकीय इमारतीमधील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सापळा लावला होता. त्यावेळी शहाजी पाटील हा १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडला.
आज येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी तक्रारदार आणि संशयित शहाजी पाटील यांच्यामध्ये झालेल्या मोबाईलवरील संभाषणात इतर काही व्यक्तींचासंदर्भात आहे. त्यामुळे या लाचप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी ग्राह्य मानत पाटील याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आदेश दिले.