आटपाडी : कोलकाता येथे सापडलेले सोने लाटण्यासाठी विटा पोलिस व फिर्यादी यांनी संगनमत करून काही राजकीय नेत्यांच्या दबावाखाली येत पोलिसांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप दोन किलो सोन्याच्या चोरीतील संशयित आरोपी सागर लहू मंडले याने केला आहे. याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांच्याकडे मंडले याने तक्रार दिली आहे.सागर मंडले याने जिल्हा पोलिस प्रमुखांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मला १० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे दोन किलो सोने सापडले होते. तेथील काही लोकांना याची माहिती झाल्याने मी तेथून गावी निघुन आलाे. दोन किलो सोने माझा मित्र सागर जगदाळे यांच्याकडे दिले होते.
हे सोने सागर जगदाळे यांच्याकडे असल्याची माहिती मिळाल्यावर सूरज मुल्ला व विटा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी काही राजकीय नेत्यांना हाताशी धरून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून सोने हडप केले.खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सागर मंडले याने केली आहे.मी तर तेव्हा नांदेडमध्ये हाेताे...विटा पोलिस ठाण्यात सूरज मुल्ला याने १६ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली आहे. या फिर्यादीत सागर मंडले यास १३ फेब्रुवारी रोजी विटा येथील खानापूर नाका येथे वडिलोपार्जित १०० ग्रॅम सोने व सात हजार रुपये व शंकर जाधव यांचे ४५५ ग्रॅम चोख सोने कोलकाता येथे घेऊन जाण्यासाठी दिले होते, असे म्हटले आहे.
मात्र १३ फेब्रुवारी रोजी मी ४०० किलाेमीटर दूर नांदेडजवळ होतो. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. यामुळे दाखल गुन्हा हा खोटा आहे. पोलिस व फिर्यादीने संगनमत करून नेत्यांच्या दबावाखाली खोटी तक्रार दिल्याचे मंडलेने म्हंटले आहे.