सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात येणारे आणि बाहेर जाणाºया रस्त्यावर सध्या पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीदरम्यान पोलिसांना फक्त दारूसाठाच सापडत असल्याचे समोर येत आहे.
येथील अंजठा चौकामध्ये वाहन तपासणीदरम्यान रविवारी सातारा शहर पोलिसांनी दुचाकीवरील दोघांना अडविले. त्यांच्या पिशवीमध्ये दारूसाठा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधित दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी अमर हिरप्पा देवकर (वय ४८, रा. विलासपूर सातारा), संतोष काशिनाथ रजपूत (वय ३२, रा. देशमुखनगर सातारा) अशी नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २२ देशी दारूच्या बाटल्या आणि १६१० रुपयांची रोकडसह दुचाकी पोलिसांनी जप्त केली. शहर पोलीस ठाण्यात देवकर आणि रजपूत या दोघांवर दारूबंदी कायन्वये गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.