सांगली : इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने पोलिस कर्मचारी सचिन जनगोंडा पाटील (वय ३४, मूळ रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा, सध्या वसंतनगर, सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. सचिन पाटील यांच्यावर त्यांच्या मूळ गावी ऐतवडे बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन पाटील २०१० मध्ये सांगली पोलिस दलात भरती झाले. ते पत्नीसह वसंतनगर येथील एका भाड्याचा इमारतीत राहत होते. ते पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या कार्यालयात कार्यरत होते. मंगळवारी दिवसभर ते ड्यूटीवर होते. रात्री साडेआठ वाजता ते ड्यूटीवरून घरी परतले. रात्री साडेदहाच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गच्चीतून त्यांचा तोल गेला. ते खाली पडल्याचे पाहून नातेवाइकांनी धाव घेतली. त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर त्यांना भारती रुग्णालय व नंतर मिरज मिशन रुग्णालयात हलविण्यात आले; पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलिस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)शांत व मनमिळावू सचिनसचिन पाटील गेली सात वर्षे पोलिस दलात कार्यरत होते. त्यांचा स्वभाव शांत व मनमिळावू होता. माजी उपमहापौर प्रशांत पायगोंडा पाटील यांचे ते मेहुणे होत. मंगळवारी ड्युटी संपवून ते घरी गेले होते. गच्चीवरून तोल गेल्याने ते पडले, असे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले आहे. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे सर्व शक्यता गृहित धरून सचिन पाटील यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी संजयनगर पोलिसांना दिले आहेत.
इमारतीवरून पडल्याने पोलिस ठार
By admin | Published: March 30, 2017 12:46 AM