कूपवाड : राज्य शासनाने गुरुवारपासून १ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर कूपवाड शहरात अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबले व सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाकडून कुपवाड शहरातील मुख्य रस्त्यावर जनजागृतीसाठी संचलन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन जाहीर केले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, तसेच नियमांचे कडक अंमलबजावणी होण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पोलिसांनी संचलन केले आहे.
यावेळी कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करा. संचारबंदीच्या नियमांचे पालन करा. महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन करत नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करू, असा इशाराही देण्यात आला. या संचलनात शंभराहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा होता.