इस्लामपूर शहरातील नागरिकांना कोरोनाबाबत सतर्क करण्यासाठी पोलीस दलाने संचलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पुकारलेल्या ब्रेक द चेनच्या अनुषंगाने संपूर्ण इस्लामपूर शहरातून पोलिसांनी संचलन केले. सायंकाळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान या संचलनात सहभागी झाले होते.
पोलीस ठाण्यापासून सुरू झालेले संचलन कचेरी चौक, यल्लम्मा चौक, गांधी चौक, जुनी भाजी मंडई, शिराळा नाका, आझाद चौक, झरी नाका, संभाजी चौक आणि महावीर चौकातून पुन्हा पोलीस ठाण्यापर्यंत येत संचलन झाले.
शहराच्या संवेदनशील भागात या संचलनावेळी ध्वनिक्षेपकावर शासनाच्या ब्रेक द चेनबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शहरवासीयांनी ३० एप्रिलपर्यंतच्या काळात पोलीस दलाला सहकार्य करावे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केले.