सचिन लाड ।सांगली : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई समाधान मांटे यांच्या कुटुंबास आर्थिक मदत करण्यासाठी अनेकांचे हात पुढे सरसावले आहेत. २०१३ मधील त्यांच्या बॅचमधील ८० पोलिसांनी पुढाकार घेऊन मदतीचे आवाहन केले आहे. त्यानुुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचाºयांकडून मदत संकलनाचे काम सुरु आहे. समाजातील काही दानशूरही मदत करण्यास पुढे आले आहेत.समाधान मांटे हा बुलडाणा जिल्ह्यातील हा तरुण जागा निघेल तिथे पोलीस भरतीला उतरायचा.
अखेर पाच वर्षांपूर्वी त्याच्या प्रयत्नाला सांगलीत यश आले आणि तो पोलिसात भरती झाला. अवघी पाच वर्षेच नोकरी केलेल्या मांटे यांचा गेल्या आठवड्यात सांगलीत खून झाला. त्यांच्या खुनाचा धक्का पत्नीसह कुटुंबातील कुणालाच सहन न होणारा आहे. हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. कर्ता पुरुषच गमावल्याची खंत त्यांना लागून राहिली आहे. पोलीस दलही हादरुन गेले आहे. मांटे यांची केवळ पाच वर्षेच नोकरी झाली आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणाºया सोयी-सुविधांच्या नियमावलीत ते बसत नाहीत. नोकरी कमी झाल्यामुळे ते पेन्शनलाही पात्र ठरत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन पोलीस दलातील माणुसकी जिवंत झाली आहे.
सांगली जिल्हा मुस्लिम समाजाने सर्वात प्रथम एक लाख रुपयांचा धनादेश मांटे यांच्या पत्नी प्रतीक्षा यांच्या नावाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच निवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेने अकरा हजार, पोलीस महिलांच्या बचत गटाने पाच हजार, तर विश्रामबाग येथील गणेश नाष्टा सेंटरचे मालक आनंद सावंत यांनी ५१ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.पोलीस ठाणे स्तरावर निधी संकलनाचे आवाहन२०१३ मध्ये सांगलीत ८० जागांसाठी पोलीस भरती झाली. यामध्ये मांटेही भरतीसाठी उतरले होते आणि ते पात्रही ठरले. त्यावेळच्या त्यांच्या बॅचचे पोलीस जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलीस ठाणे स्तरावर मदत करण्याचे आवाहन या सर्वांनी केले आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. पोलीस शिपायापासून निरीक्षकांपर्यंत सर्वजण मदतीला हातभार लावत आहेत. पाच लाख रुपये मदत गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.