सांगली : सांगलीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. समाधान मानटे (वय ३०) असं जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून धारदार हत्याराने १८ वार करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली. विश्रामबाग येथील कुपवाड रस्त्यावर रत्ना डिलक्स हॉटेलच्या आवारात सोमवारी ( 16 जुलै ) रात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. यामध्ये दोन हल्लेखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
समाधान मानटे मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. सांगली जिल्हा पोलीस दलात ते २०१३ मध्ये भरती झाले. मिरज शहर पोलीस ठाण्यात ते नेमणुकीस होते. मानटे विश्रामबाग येथील पोलीस वसाहतीमध्ये पत्नीसह राहत होते. मंगळवारी रात्री ड्यूटी संपवून घरी येत असताना रत्ना हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेले. काउंटरवर बिल देताना त्यांचा दोन ग्राहकांशी वाद झाला. त्यानंतर ते हॉटेल व्यवस्थापकाशी हॉटेलच्या आवारातच बोलत थांबले. दरम्यान, वाद झालेले ग्राहक हॉटेलबाहेर निघून गेले. यातील एकजण गाडीतील धारदार हत्यार घेऊन आला. त्याने मानटे यांच्यावर सपासप १८ वार केले. यामध्ये मानटे यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, गुंडविरोधी पथक, संजयनगर, विश्रामबाग, सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मृत मानटे गणवेशात होते. मानटे यांच्या खूनाची घटना हॉटेलमधील 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचे फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्याआधारे पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. तसेच हॉटेलच्या व्यवस्थापकसह चार कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.