सांगली : खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे, हवालदार प्रमोद रोडे व सोलापूर पोलिस आयुक्त कार्यालयातील उपनिरीक्षक राजाराम चिंचोळकर या तिघांचा पगार व व भत्ते थांबवावेत, अशी विनंती राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने केली आहे. यासंदर्भात सोलापूरचे पोलिस आयुक्त व सांगलीच्या जिल्हा पोलिसप्रमुखांना लेखी पत्र देण्यात आले आहे. पण अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे सीआयडी विभागातून सांगण्यात आले.सहा महिन्यांपूर्वी उमदीत एका महिलेचा खून झाला होता. याप्रकरणी धुमकनाळ (ता. इंडी, जि. विजापूर) येथील चंद्रशेख नंदगोड यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ६ जूनला त्याने पोलिस ठाण्यातील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केल्याने हे प्रकरण चौकशीसाठी सीआयडीकडे सोपविले होते. चौकशीत पोलिसांनी मारहाण तसेच डांबूून ठेवल्याने भीतीने नंदगोड याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार वाघमोडे, चिंचोळकर व रोडे यांच्याविरुद्ध डांबून ठेवणे, मारहाण करणे व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच या तिघांनी अटकेच्याभीतीने पलायन केले. गुन्हा दाखल होऊन पाच महिने झाले तरी त्यांना पकडण्यात सीआयडीला यश आले नाही. अटकेची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी जिल्हा तसेच मुंबई उच्च न्यायालयातून जामीन घेण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला.वाघमोडे व रोडे सध्या उमदी पोलिस ठाण्यात, तर चिंचोळीकर सोलापूर पोलिस आयुक्तालयात सेवेत आहेत. सीआयडीने त्यांच्या शोधासाठी सांगली व सोलापूर जिल्ह्यात छापे टाकले. मात्र त्यांचा सुगावा लागला नाही. सीआयडीने याचा अहवाल जतच्या न्यायालयात सादर केला. यावर न्यायालयाने या तिघांचे पकडवॉरंट जारी केले. ते शरण येतील, अशी सीआयडीला आशा होती. परंतु त्यांनी दुसऱ्यांदा जिल्हा न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. गेल्याच आठवड्यात जामिनावर सुनावणी झाली. न्यायालयाने तिघांचाही जामीन फेटाळला. तिघांविरुध्द खात्याअंतर्गत अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे सीआयडीचे कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे अधीक्षक राजेंद्र बनसोडे यांनी वाघमोडे, चिंचोळकर व रोडे या तिघांचे पगार व भत्ते थांबविण्याची विनंती सोलापूर पोलिस आयुक्त व सांगलीच्या जिल्हा पोलिसप्रमुखांना केली आहे. यासंदर्भात लेखी पत्रही दिले आहे. (प्रतिनिधी)शरण येण्याची तयारी!गुन्हा दाखल झाल्याचे समजताच वाघमोडे व चिंचोळकर रजेवर गेले. रोडे न सांगताच गैरहजर राहिला आहे, अशी माहिती सीआयडीला मिळाली आहे. तिघांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती यापूर्वीच सोलापूरचे पोलिस आयुक्त व सांगलीच्या जिल्हा पोलिसप्रमुखांना देण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध अजूनही खात्याअंतर्गत कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यांचे पगार व अन्य भत्ते सुरुच आहेत. त्यामुळे सीआयडीच्या अधीक्षकांनी त्यांचे पगार व भत्ते थांबविण्याची विनंती केली आहे. यावर कार्यवाही झाली का नाही, याची माहिती मिळाली नसल्याचे सीआयडी विभागातून सांगण्यात आले. दरम्यान, न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळत नसल्याने या तिघांनी सीआयडीला शरण येण्याची तयारी दर्शविली असल्याचे समजते.
पोलिस अधिकाऱ्यांसह तिघांचे पगार थांबवावेत!
By admin | Published: October 09, 2016 12:35 AM