इस्लामपूर (जि. सांगली) : पोलीस प्रशासन आणि स्थानिक पातळीवरील नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पोलीस पाटील हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. पोलीस पाटील आणि ग्रामसुरक्षा दल यांचे काम अधिक चांगले व्हावे यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार योजना राबविणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी जाहीर केले.
येथील राजारामबापू नाट्यगृहात इस्लामपूर पोलीस उपविभागातील वाळवा, शिराळा तालुक्यांतील सर्व गावांचे पोलीस पाटील आणि ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांची कार्यशाळा झाली. यावेळी बोराटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक किशोर काळे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
बोराटे म्हणाले, पोलीस पाटील यांनी स्थानिक पातळीवर काम करताना गावात घडणाºया सर्व घडामोडींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. त्यांनी निष्पक्षपातीपणे काम केले पाहिजे. पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलातील सदस्यांनी स्वत:सह आपले कुटुंब आणि आपले गाव सुधारण्याच्यादृष्टीने सक्रिय राहायला हवे. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
ग्रामसुरक्षा दलातील कायदेशीर तरतूद, त्याचे संघटन, सदस्यांचे कायदेशीर अधिकार, कर्तव्य आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामसुरक्षा रक्षकांची कामगिरी याबाबत माहिती दिली.