उंब्रज : भुयाचीवाडी (ता. कऱ्हाड) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात उंब्रज पोलिसांना यश आले. ऐन विवाहाप्रसंगी पोलिसांनी लग्न मंडपात एंट्री केली. सुरू असलेला विवाह थांबवला त्यानंतर वऱ्हाडी मंडळीसह ग्रामस्थांच्या लक्षात नेमका प्रकार आला. पोलिसांनी वऱ्हाडींना थेट पोलिस ठाण्यापर्यंत आणले.याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचे सांगली जिल्ह्यातील एक कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून भुयाचीवाडी येथे वास्तव्यास आहे. मोलमजुरी करून हे कुटुंब या गावात उदरनिर्वाह करते. अशिक्षित असणाऱ्या या कुटुंबातील १७ वर्षीय युवतीचा विवाह सांगली जिल्ह्यातील एका मुलाशी ठरला होता. मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास विवाह पार पाडण्याच्या हेतूने सर्व तयारी झाली होती. दरम्यान, उंब्रज पोलिसांना भुयाचीवाडी येथे बालविवाह सुरू असण्याची माहिती निनावी फोनद्वारे मिळाली. त्यानंतर तत्काळ उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, पोलिस हवालदार हेमंत मुळीक, सतीश मयेकर, हेमंत कुलकर्णी, विजय भिगारदेवे, शंकर घाडगे, नलवडे या पोलिस कर्मचाऱ्यांनी भुयाचीवाडीकडे धाव घेतली. त्यावेळी लग्नाला फक्त १५ मिनिटांचा अवधी बाकी होता. तत्पूर्वी पोलिसांनी संबंधित बालविवाह थांबविला. (प्रतिनिधी)
पोलिसांनी रोखला बालविवाह
By admin | Published: February 28, 2017 11:42 PM