मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाच्या तक्रारीमुळे पोलिसांनी डॉ. जाधव याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्याच्यासह अन्य आठ जणांना अटक केली आहे. मंगळवारी रात्री गांधी चौक पोलिसांनी डॉ. जाधव याच्या सांगलीतील घरावर छापा टाकून कोविड रुग्णांवर उपचारासंबंधी कागदपत्रे जप्त केली. या कागदपत्रांची पोलीस छाननी करीत आहेत.
रुग्णालयात कोणत्याही सुविधा नसताना महापालिकेने डाॅ. जाधव यास कोविड रुग्णालय सुरु करण्यास परवानगी दिल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
डॉ. जाधव याने अॅपेक्स रुग्णालयाच्या नावाने औषधांची खरेदी करून एम. जे. कॉस्मेटिक नावाने विक्री केली आहे. अॅपेक्समध्ये औषध विक्रीचा परवाना नसतानाही त्याने एम. जे. कॉस्मेटीक या नावाने औषध विक्री केल्याचे अन्न व औषध प्रशासनच्या चौकशीत समोर आले आहे. डॉ. जाधव याच्या वादग्रस्त अॅपेक्स रुग्णालयाबाबत जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनीही महापालिका आयुक्त कापडणीस यांच्याकडे अहवाल मागविल्याची माहिती मिळाली.