सांगली : कॅफेतील अत्याचाराच्या घटनेनंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने आक्रमक भूमिका घेतली. याची दखल पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गांभीर्याने घेतली. कॅफेच्या तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार, शहरात विविध कॅफेंवर पोलिसांच्या पथकानी छापे टाकले. उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी मोहीम करण्यात आली.उद्यापासून निर्भया पथकातील पोलिसांना या ठिकाणी पाठविले जाणार आहे. शंभरफुटी रस्त्यावरील हँगऑन कॅफेत गुंगीचे औषध देऊन अत्याचाराची घटना समोर आली. त्यानंतर, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हँगऑन कॅफेची तोडफोड केली. बंदिस्त कंपार्टमेंट असणाऱ्या विश्रामबाग परिसरातील अन्य दोन कॅफेंचीही तोडफोड करण्यात आली. पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना कॅफे तपासणीबाबत सूचना दिल्या आहेत.महापालिकेनेही प्रभागनिहाय पथके नियुक्त केली आहेत. मंगळवारी उपाधीक्षक जाधव यांनी दोन पथके तयार केली. त्यात निर्भया आणि दामिनी पथकाचा समावेश करण्यात आला. शहरातील कॅफेंवर छापे टाकत तेथील तपासणी करण्यात आली. सायंकाळपर्यंत सांगली तपासणी करण्यात आली. उद्यापासून ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे.
सांगलीतील कॅफेंवर पोलिसांचे छापे, दोन पथके तैनात; अत्याचाराच्या घटनेनंतर तपासणी मोहीम सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 3:58 PM