सांगली : घरफोडीच्या गुन्ह्यात न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला गैरहजर राहणाऱ्या एका संशयिताचे पकडवॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिसांना हा संशयित मृतावस्थेत मिळून आला. सचिन नारायण देसाई (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे मृत संशयिताचे नाव आहे. मृतदेहाजवळ त्याच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून पोलिसांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी तो मृत झाल्याचा अहवाल न्यायालयात दिला आहे. सचिन देसाई हा घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. गेल्या काही महिन्यांपासून देसाईविरुद्ध न्यायालयात चोरी, घरफोडीच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीला तो सातत्याने गैरहजर रहात होता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध ‘पकडवॉरंट’ बजावले होते. विश्रामबाग पोलिसांनी हे वॉरंट बजावण्यासाठी त्याचा शोध सुरू ठेवला होता. मात्र तो सापडत नव्हता. शुक्रवारी सायंकाळी इंदिरानगर झोडपट्टीत ‘कोंम्बिग आॅपरेशन’ मोहीम राबविण्यात आली होती. संशयित गुन्हेगारांची धरपकड, वाहनधारकांची तपासणी सुरू होती. त्यावेळी वॉरंटमधील फरारी देसाई घरात असल्याची माहिती मिळाली होती. कोंम्बिग आॅपरेशन संपल्यानंतर दोन पोलीस त्याच्या घराकडे गेले. घराजवळ लोकांची गर्दी होती. महिलांच्या रडण्याचा आवाज येत होता. पोलीस दबकत घरापर्यंत गेले. तोपर्यंत एकाचा मृतदेह अंगणात आणण्यात आला. पोलिसांनी कोण मृत झाले आहे, याची चौकशी केली. सचिन देसाई हा मृत झाल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. सायंकाळी पाच वाजताच देसाई तो मृत झाला होता. तेथील लोकांना पोलिसांकडे तुम्ही कशासाठी आला आहात? कुणाकडे काम आहे? याची चौकशी केली. तथापी पोलिसांनी काही नाही, असे सांगून तेथून काढता पाय घेतला. देसाई मृत झाला असल्याचा अहवाल पोलिसांनी आता जिल्हा न्यायालयाकडे सादर केला आहे. (प्रतिनिधी)
पोलीस पोहोचले, पण तो मिळाला मृतावस्थेत!
By admin | Published: July 05, 2015 1:17 AM