पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सफाई कर्मचारी यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा असल्याने त्यांना कोणत्याही लसीकरण केंद्रावर प्राधान्याने लस देण्यात येते. सध्या पोलीस कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. मिरजेत शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सोमवारी दुपारी किसान चौकात महापालिका रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यास गेला होता. तेथील शिपायाने ‘तुम्ही रस्त्यावर आमच्या गाड्या अडवता, मग आम्ही तुम्हाला लस का देऊ’, अशी विचारणा करून पोलिसास परत पाठविले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार संबंधित पोलिस कर्मचाऱ्यासोबत तेथे गेले. यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही ४५ वर्षांखालील कोणाला लस देता येणार नाही, असा पावित्रा घेतला. निरीक्षक राजू तहसीलदार यांनी संबधित डॉक्टरांना लसीकरणाच्या नियमांची आठवण करून दिल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यास लस देण्यात आली. पोलीस निरीक्षकांनी जाब विचारल्याने शिपायाचीही बोबडी वळली. कोरोना साथीदारम्यान पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी फ्रंट लाइन वर्कर्स म्हणून जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र दोघांत समन्वय नसल्याने रस्त्यात गाडी अडवित असल्याच्या किरकोळ कारणावरून पोलिसाला हिसका दाखविण्याचा प्रयत्न शिपायाच्या अंगलट आला.
मिरजेत रस्त्यावर गाड्या अडविता म्हणून पोलिसाला कोरोना लस देण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:28 AM