सांगली : शहरातील माधवनगर रोडवरील दुर्गामाता मंदिरासमोर वाहन तपासणीच्या नावाखाली पोलिसाने दारू पिऊन धिंगाणा घातला. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असलेला किशोर रघुनाथ कदम याच्यासह जहांगीर सलीम शेख (वय ३४, रा. मंगळवार बाजार परिसर) व अझर बिलाल शेख (वय २६, रा. अभयनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी गंभीर दखल घेत कदम याला निलंबित केले आहे तर यावेळी त्याला मदत करणारे मिरज शहर पोलीस ठाण्यातील राजेश गवळी या पोलिसाची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असलेला किशाेर कदम हा आपल्या मित्रांसह शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुर्गा माता मंदिरासमोर रस्त्यावर वाहनातून आला होता. याठिकाणी थांबत तिघांनीही आम्ही पोलीस असून, वाहने तपासत असल्याचे सांगत दंगा सुरू केला. रात्रीच्या वेळी शांततेत येणारी जाणारी वाहने अडवत या तिघांचा दंगा सुरू असल्याने काही नागरिकही याठिकाणी आले. त्यांनाही तिघांनी अरेरावी केली. अखेर या भागातील नागरिकांनी या प्रकाराची माहिती शहर पोलिसांना दिली. शहर पोलीस ठाण्याकडील कर्मचारी घटनास्थळी आले असता, संशयित तिघेजण दारू पिऊन मोठमोठ्याने दंगा करत होते. यावेळी मिरज शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला राजेश गवळीही तिथे हजर होता.
शहर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांची वैदयकीय चाचणी केली असता, त्यात तिघेही दारू प्यायले असल्याचे सिध्द झाले. त्यानंतर तिघांवरही शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट
अधीक्षक गेडाम यांच्याकडून गंभीर दखल
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत किशोर कदम याला निलंबित करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रात्रीच्या वेळी रस्त्यावर दारू पिऊन दंगा करणाऱ्यांना सहकार्य करणाऱ्या राजेश गवळी याची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.