सचिन लाड ।सांगली : जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. समाजात प्रत्येक जातीनिहाय संघटना झाल्या आहेत. सातत्याने कोठे-ना-कोठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांचा वेळ खर्ची होत असल्याने वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे, असे मत सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील विशेषत: सांगली शहरातील गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वाढला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, चोरी, घरफोडी व चेनस्नॅचिंग अशाप्रकारचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. अनिकेत कोथळे प्रकरणामुळे पोलिस दलाचे खच्चीकरण झाले. अजूनही या प्रकरणातून पोलिसांनी उभारी घेतलेली नाही. गुन्हेगारी रोखणे, गुन्हेगारांना शिक्षा होणे, खबºयांचे नेटवर्क बळकट करणे यासह अन्य बाबी करण्यासाठी पोलिसांनी काय करायला हवे, याबद्दल शिंदे यांच्याशी संपर्क साधला.
शिंदे म्हणाले, लोकसंख्या जशी झपाट्याने वाढली, तशी पोलिसांची संख्या वाढली नाही. शहराबरोबर ग्रामीण भागाचे विस्तारीकरण वेगाने वाढले. पूर्वी संपर्काची साधने नव्हती. विशिष्ट समाजातील टोळ्या गुन्हे करायच्या. पोलिसांचे खबºयांचे नेटवर्क चांगले होते. सामाजिक काम म्हणून काही लोक पोलिसांना माहिती देण्यास पुढे येत असत, पण आता परिस्थिती बदलली आहे. कोण गुन्हेगार आहे? हेच समजत नाही. माणसाची वृत्तीही बदलत आहे. समाजात जातीनिहाय संघटना झाल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची ताकद खर्ची होत असल्याने त्यांना गुन्ह्यांचा छडा लावण्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. आंदोलने, जयंती, सण, उत्सवाच्या बंदोबस्ताचेच काम करावे लागत आहे.
शिंदे म्हणाले, कायद्यामध्येही बदल झाले आहेत. त्याचा गुन्हेगार फायदा घेत आहेत. पहिल्या गुन्ह्यात अटक झाली की, तो पोपटासारखे बोलतो; पण कारागृहात जाऊन आला की तो चांगलाच तयार होतो. पुन्हा अटक झाली की तो काहीच बोलत नाही. अनेकदा साक्षीदार पुढे येत नाहीत. पंच होण्यास कोणी तयार होत नाही. पूर्वी मारामारीच्या गुन्ह्यात दोन-दोन महिने आरोपींना जामीन मिळत नसे. ही परिस्थिती आता बदलली आहे. गुन्हेगाराला पकडले की पोलिस तपासातत्याचे नातेवाईक, काही संघटना व राजकीय नेते हस्तक्षेप करतात.खबºयांचे नेटवर्क हवेआजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळली आहे. चैनीसाठी पैसा कमी पडत असल्याने ते चोरीचा मार्ग निवडतात. गुन्हेगारी करणारे गुन्हेगार १८ ते २५ वयोगटातील सापडत आहेत. या नव्या गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचे नवे तंत्र आजच्या पोलिसांनी अवलंबिले पाहिजे. यासाठी खबºयांचे नेटवर्क बळकट हवे. प्रलंबित खटल्यांचे निकाल तातडीने लागून गुन्हेगारांना शिक्षा वाढीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. अनेकदा पोलिसांना तपासासाठी वेळ मिळत नसल्याने गुन्हेगारांची चौकशी करता येत नाही. याचा गुन्हेगार गैरफायदा घेतात, असे शिंदे यांनी सांगितले.