मसूर : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा अस्थिकलश घेऊन मसूर ते नागपूर अशी यात्रा काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या यात्रेसाठी अस्थिकलश देऊ नये, अशी नोटीसच पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याच्या नातेवाइकांना दिली. तसेच अस्थिकलश दिल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला. त्यामुळे नातेवाइकांनी संबंधित पदाधिकाऱ्याला कलश देण्यास नकार दिला.मसूर येथील शेतकरी दामोदर बर्गे यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी बर्गे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करीत आहेत. अशातच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मसूर येथील शेतकऱ्याचा अस्थिकलश घेऊन दुचाकीवरून मसूर ते नागपूर अशी यात्रा काढण्याचे नियोजन मानवाधिकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय जाधव यांनी केले होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करीत हा अस्थिकलश मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठेवण्यात येणार होता. त्यासाठी विजय जाधव यांनी पोलिसांकडे परवानगीही मागीतली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. तसेच अस्थिकलश यात्रेसाठी देऊ नये. या प्रकाराने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. तसे झाल्यास बर्गे कुटुंबीयांवरच कारवाई केली जाईल, अशी नोटीस पोलिसांनी मयत दामोदर बर्गे यांचा मुलगा विक्रांत व प्रशांत बर्गे यांना दिली. मंगळवारी दुपारी विजय जाधव हे काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन मसूरमध्ये आले. त्यांनी बर्गे कुटुंबीयांकडे अस्थिकलशाची मागणी केली. मात्र, कुटुंबीयांनी त्यांना कलश देण्यास नकार दिला. दरम्यान, शिवसेना संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्यासह उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रामभाऊ रैनाक, तालुका उपप्रमुख तात्यासाहेब घाडगे, सतीश पाटील, संजय भोसले, जयवंत पाटील, सुनील पाटील, राजेंद्र घाडगे, दत्तात्रय पवार, भरत चव्हाण आदींनीही मसूर येथे बर्गे कुटुंबीयांची भेट घेतली. याचवेळी अस्थिकलशाच्या कारणावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करून बर्गे कुटुंबीयांनाच नोटीस बजावल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. शेतकरी कुटुंबीयांना नोटीस देण्याऐवजी ज्यांची कर्जे आहेत त्यांना का नोटीस बजावली नाही, असा सवाल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना विचारला. त्यामुळेही काहीकाळ तणाव निर्माण झाला. अखेर विजय जाधव यांनी आपण ही यात्रा रद्द करीत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
‘अस्थिकलश यात्रा’चा प्रयत्न पोलिसांनी रोखला
By admin | Published: April 12, 2017 12:29 AM