सांगली : अंकली (ता. मिरज) येथे गुरुवारी रात्री ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या नाकाबंदीवेळी कारने दिलेल्या धडकेत उपनिरीक्षक जखमी झाले. धडक दिल्यानंतर तती कार वडापावच्या दुकानात घुसली. यामध्ये उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली.
रामराव पाटील असे जखमी झालेल्या उपनिरीक्षकांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संतोष भीमराव मींद (वय ३५, रा. बिजेवाडी, इंदापूर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुरुवारी अमावस्या असल्याने अंकली फाटा येथे नाकाबंदी लावली होती. तेथे जखमी पाटील यांच्यासह इतर पोलिसांचे पथक वाहनांची तपासणी करत होते.
रात्री पावणे एकच्या सुमारास मिरजेकडून एक कार (एमएच ४२ बीजे ४६९३) भरवेगात तिथे आली. त्या कार चालकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र त्याने न थांबता पोलिसांना जोरदार धडक दिली. यामध्ये उपनिरीक्षक पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित मिंद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.