गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील व पुणे येथील एटीएसमध्ये ‘पोलिस नाईक’ पदावर कार्यरत असणाऱ्या संपत बळवंत वारके यांनी गावाला प्रत्येक सोमवारी स्वत:च्या विहिरीचे पाणी टँकरने आणून देण्याचा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ सोमवार, दि. २८ रोजी ग्रामदैवत अमृतेश्वर देवालयासमोर नाना स्वामी यांच्याहस्ते पूजन करुन करण्यात आला. या उपक्रमाचे ग्रामस्थांतून स्वागत करण्यात आले. येथील पोलिस नाईक संपत वारके व त्यांचे थोरले बंधू शेतकरी दिलीप वारके यांनी भडकंबे शिवारातील शेतात विहीर खुदाई केली होती. त्या विहिरीस जेमतेम पाणी होते. त्यावर त्यांनी आडवी बोअर मारल्याने चांगले पाणी लागले. म्हणून या वारके बंधूंनी गावातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने टँकरने पाणी देण्याचा निर्णय घेतला. वारके कु टुंबाला पोलिस सेवेचा वारसा आहे. त्यांचे वडील पोलिस सेवेत होते. पोलिस असल्याने आपण समाजाचे देणे लागतो, गावासाठी आपण काही तरी केले पाहिजे, या हेतूने पाणी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे वारके बंधूनी सांगितले. त्यांनी सोमवारी ग्रामदैवत अमृतेश्वर देवालयासमोर नाना स्वामी यांच्याहस्ते पूजन करून या उपक्रमाचा प्रारंभ केला व गावातील प्रत्येक भागातून टँकरने पाणी घरपोच केले. पहिल्याचदिवशी त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांतून स्वागत करण्यात आले. त्यांच्या उपक्रमासाठी सरपंच सविता कोळी, उपसरपंच विजयबापू पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे. (वार्ताहर)उपक्रमाचे कौतुकपाणी वाटपाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याने गोटखिंडी ग्रामपंचायतीनेही दर सोमवारी मोफत टॅँकर देण्याचे मान्य केले आहे, तर ट्रॅक्टर स्वखर्चातून भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय वारके बंधूंनी घेतला आहे. या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.
पोलिसाने भागवली गोटखिंडीची तहान!
By admin | Published: March 29, 2016 11:21 PM