सांगली : सायलेन्सरमध्ये बदल करून फटफट आवाज करत फटाके फोडणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला. रविवारी रात्री चार तासांच्या नाकाबंदीमध्ये १२ बुलेट ताब्यात घेतल्या. सोमवारी नवीन सायलेन्सर बदलून, दंडाची पावती फाडल्यानंतरच बुलेट ताब्यात दिल्या.गेल्या काही दिवसांपासून सुसाट बुलेटस्वारांनी अनेकांच्या उरात धडकी भरवली होती. रात्रीच्या वेळेस रस्त्यावर वेगाने बुलेट जाताना फटाके फोडल्यासारखा आवाज आल्यामुळे अनेकांची त्रेधातिरपिट उडत होती. तसेच संबंधित बुलेटस्वार वेगाने जात असल्यामुळे त्यांचा पाठलाग करून कारवाई करणेही अवघड बनले होते. कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते.अधीक्षक घुगे, अपर अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, उपनिरीक्षक शेखर निकम आणि सात ते आठ जणांच्या पथकाने रविवारी रात्री ९ ते मध्यरात्री एकपर्यंत नाकाबंदीची मोहीम राबविली. अधीक्षक घुगे हेदेखील रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर पथकाने कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या १२ बुलेट ताब्यात घेतल्या. या बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यासारखा आवाज केल्याचे निदर्शनास आले.
सोमवारी संबंधित बुलेटचे सायलेन्सर काढण्यात आले. बुलेटच्या मालकांना नवीन सायलेन्सर आणून बसविण्याच्या सूचना दिल्या. तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार परवाना नसणे, विमा उतरविला नसणे आदी केसेसनुसार दंडात्मक कारवाई केली. दीड हजारापासून ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईची चर्चा रंगली होती.
दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे नियमाचे पालन करावे. -मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा