तासगाव : गावगाड्यातील शासनाचा महत्त्वाचा कणा असणाऱ्या आणि गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या पोलीसपाटलांना आता कलम ३५३चे सुरक्षा कवच मिळणार आहे. यापुढे कर्तव्य बजावत असताना पोलीसपाटलांना मारहाण झाल्यास संबंधितांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होणार आहे.
याबाबतचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. या निर्णयाने पोलीसपाटलांना बळकटी मिळणार आहे. गाव पातळीवर पोलीसपाटील हा शासनाचा महत्त्वाचा कणा समजला जातो. गावातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पोलीसपाटील बजावत असतो. शासनाचे कान आणि डोळे बनून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असताना, कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी पोलीसपाटलांवर असते. अशातच कर्तव्य बजावत असताना पोलीसपाटलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
अनेक गावांत पोलीसपाटलांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. मानधन तत्त्वावर काम करण्याऱ्या पोलीसपाटलांना कायद्याचे सुरक्षा कवच मिळावे, यासाठी पोलीसपाटलांवर हल्ला झाल्यास कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलीसपाटील संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीला डिसेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत शासनाकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. त्यानुसार राज्याच्या उपसचिवांनी पोलीस महासंचालकांना सूचना दिल्या होत्या.
शासनाच्या निर्णयानुसार यापुढे कर्तव्य बजावत असताना पोलीसपाटलांना मारहाण झाल्यास, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पोलीसपाटलांवर हात उचलणे महागात पडणार असून, पोलीसपाटलांना कर्तव्य बजावताना येणारे अडथळे कमी होणार आहेत.