लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : राज्य राखीव पोलीस दलातील पोलिसाच्या पत्नीने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास लेंगरे (ता. खानापूर) येथे घडली. उजिता जोतीराम शिंदे (वय ३०), रिया जोतीराम शिंदे (६) व केदारनाथ जोतीराम शिंदे (एक वर्ष, सर्व रा. पाटीलवस्ती, लेंगरे) अशी मायलेकरांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
लेंगरेतील जोतीराम शिंदे अमरावती येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचा आठ वर्षांपूर्वी कलेढोण येथील उजिता यांच्याशी विवाह झाला होता. वर्षभरापूर्वी त्या प्रसूतीसाठी माहेरी गेल्या होत्या. पंधरा दिवसांपूर्वी त्या मुलांसह सासरी आल्या होत्या. जोतीराम शिंदे दि. १ मे रोजी सुटी घेऊन लेंगरे येथे आले होते. घरी शिंदे दाम्पत्यासह मुलगी, मुलगा व जोतीराम यांचे आई-वडील एकत्र राहत होते.
शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक उजिता दोन मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी पाटील वस्तीवरील दुर्योधन शिंदे यांच्या शेतातील विहिरीत मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ पत्नी आली नसल्याने पतीसह स्थानिक लोकांनी विहिरीत शोध घेतला असता उजिता यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. रात्र असल्याने रिया व केदारनाथ या चिमुरड्यांच्या शोधकार्यात अडथळा आला. शनिवारी सकाळी आठ वाजता विटा पोलिसांच्या मदतीने दोन मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, अमोल पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीसपाटील पुष्पा बोबडे यांनी विटा पोलिसांत वर्दी दिली आहे. विटा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मायलेकरांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
मुलांच्या हाताला धरून उडी घेतली
मुलगी रियाच्या हाताला धरून, तर एक वर्षाचा मुलगा केदारनाथला कडेवर घेऊन उजिता शिंदे रात्री घराबाहेर पडल्याचे काहींनी सांगितले. मुलांना सोबत घेऊनच त्यांनी विहिरीत उडी मारल्याचे पोलिस तपासात स्पष्ट होत आहे.