जत : तालुक्यातील वाळू तस्करांविरोधात कारवाई करण्यासाठी लेखी मागणी करूनही जत व उमदी पोलिसांकडून बंदोबस्त मिळत नाही. विनापरवाना वाळू वाहतूक करत असलेली वाहने महसूल प्रशासनाने दिवसभर कारवाई करून पोलिसांच्या ताब्यात दिली, तर ती वाहने पोलीस ताब्यात घेत नाहीत. तुम्ही स्वत: जाऊन फिर्याद द्या. त्यानंतर वाहन ताब्यात घेतो, असे पोलीस सांगत आहेत. त्यामुळे कारवाई करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत, अशी माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.महसूल विभागाला ऐनवेळी जाऊन कारवाई करावी लागत आहे. त्यांना कोणतेही संरक्षण नसते. काहीवेळा वाळू तस्कर प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना विरोध करणारी यंत्रणा आमच्याकडे नाही. दिवसभर महसूल प्रशासन आणि सूर्यास्तानंतर विनापरवाना वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक आहे. विनापरवाना वाळू वाहतूक करणारे वाहन महसूल विभागाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर ते ताब्यात ठेवून घेऊन संबंधितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु तसे केले जात नाही. तहसीलदार यांचा आदेश मानला जात नाही. त्याचा अवमान पोलीस खात्याकडून केला जात आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.२ डिसेंबर रोजी मी स्वत: नायब तहसीलदार ए. पी. भस्मे, संख मंडल अधिकारी गुरुबसव शेट्यापगोळ व मंडलातील सर्व गावकामगार तलाठी आणि कोतवाल यांनी एकत्रित मिळून विनापरवाना वाळू वाहतूक करणारे सहा ट्रक पकडून सुमारे १५ ते १८ ब्रास वाळू जप्त केली आहे. त्यातील ट्रक (क्र. एमएच १०/ ए. डब्ल्यू ४९८९), (एमएच १०, बी. आर. ९५९९), एमएच ४५/ ५८५) एमएच १०/ ए. डब्ल्यू ७१८७) (एमएच १०/ ए. डब्ल्यू ७०८०) व क्रमांक नसलेला नवीन एक ट्रक अशी सहा वाहने आहेत. याबाबत प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार विनापरवाना वाळू वाहतूक करणारे सहा ट्रक पकडून सुमारे १५-१८ ब्रास वाळू जप्त केली आहे. त्यातील पाच ट्रक व क्रमांक नसलेला नवीन एक ट्रक अशी सहा वाहने आहेत. वाळू तस्कारांबाबत वेळोवेळी सूचना देऊनही तस्करांना पकडण्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळाले नाही. यासंदर्भात आम्ही प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना अहवाल सादर करणार असल्याचेही अभिजित पाटील यांनी सांगितले.
वाळू तस्करांविरोधात पोलिसांचे असहकार्य
By admin | Published: December 03, 2015 11:29 PM