लाेकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींची निवडणूक पुढील महिन्यात जाहीर झाली आहे. नववर्षात ग्रामपंचायत आपल्याच हातात ठेवण्यासाठी गावातील स्थानिक नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. प्रमुख राजकीय नेतेही निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. या निवडणुकीत सत्ता खेचण्यासाठी मोठा संघर्ष होणार असल्याचे चित्र आहे.
काेराेनामुळे तब्बल वर्षभर ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडली. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ग्रामपंचायतीची सत्ता हातात असेल, तर पुढच्या सर्व निवडणुका सोप्या जातील, या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस, खासदार संजयकाका पाटील गट, अजितराव घोरपडे गट, काँग्रेस, शिवसेना आदी पक्ष जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील मोघमवाडी, नांगोळे, बनेवाडी, जांभुळवाडी, तिसंगी, चोरीची, इरळी, निमज, थबडेवाडी, रायवाडी आणि म्हैसाळ (एम) या अकरा ग्रामपंचायतींसाठी निवडणुका हाेत आहेत. यंदा कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना मुदतवाढ दिली होती. आता निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
आगामी बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकाही समाेर असल्याने ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यामुळे या ११ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी स्थानिक नेत्यांसह विविध पक्षांचे वरिष्ठ नेतेही जोमाने कामाला लागले आहेत. तालुक्यावर राजकीय वर्चस्व ठेवण्यासाठी आमदार गट, खासदार गट, अजितराव घोरपडे गट यांच्यात प्रमुख चुरस पाहावयास मिळणार आहे.
चौकट
ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम
२३ ते ३० डिसेंबर २०२० : उमेदवारी अर्ज दाखल
३१ डिसेंबर २०२० : छाननी
०४ जानेवारी २०२१ : उमेदवारी अर्ज मागे घेणे
१५ जानेवारी २०२१ : मतदान
१८ जानेवारी २०२१ : मतमोजणी
चाैकट
तालुक्यातील ग्रामपंचायती व सदस्य संख्या
मोघमवाडी (०७), नांगोळे (०९), बनेवाडी (०९), जांभुळवाडी (०७), तिसंगी (०९), चोरोची (०९), इरळी (०९), निमज (०७), थबडेवाडी (०९), रायवाडी (०७), म्हैसाळ (एम) (०७).