सांगली: राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. आरक्षणाची मागणी लावून धरली की सत्तेत असलेल्या किंवा इतरही पक्षाकडून वेगवेगळी कारणे सांगून आरक्षण टाळले जात आहे. याचमुळे कोणत्याही राजकीय पक्षाला मराठा समाजाच्या प्रश्नाचे काहीही देणेघेणे नसल्याने सर्व राजकीय पक्षांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. शनिवारी शहरातील अमरधाम स्मशानभूमीत हा अंत्यविधी केला जाणार असून, उत्तर कार्यावेळी तीन हजार लोकांचे जेवणही घातले जाणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गावबंदी, साखळी उपोषण आंदोलनाला धार आली आहे. सांगलीतही विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. आरक्षणाची वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजकीय पक्षांविषयी मराठा समाजामध्ये संतापाची भावना आहे. याचमुळे आरक्षणाचा निर्णय घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या राजकीय पक्षांचे अंत्यविधी घातला जाणार आहे. त्यानुसार शनिवार दि. ४ रोजी राम मंदिर चौकातून या अंत्ययात्रेला सुरूवात होईल, कॉग्रेस भवन, स्टेशन चौक, महापालिका, हरभट रोडमार्गे अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्का केले जाणार आहेत. रविवार दि. ५ रोजी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रमही होणार आहे. तर मंगळवार दि. ७ रोजी उत्तर कार्य घालत तीन हजार लोकांना तरूण भारत क्रीडांगणावर जेवणही घातले जाणार आहे.
मराठा समाजाच्या प्रश्नासाठी राजकीय पक्ष किती असंवेदनशील आहेत हेच दाखविण्यासाठी अशाप्रकारचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी डॉ. संजय पाटील, पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, महेश खराडे, शंभूराज काटकर, युवराज शिंदे, अमित लाळगे, आनंद देसाई, गजानन साळुंखे यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.