शरद जाधव सांगली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी हाती असल्याने वॉररूम सज्ज झाल्या आहेत. गेल्या काही निवडणुकांपासून सोशल मीडियावरील प्रचाराला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यावर भर दिला आहे. पक्षकार्यालयांसह प्रचार कार्यालयात लगबग असून, प्रचारसाहित्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी कमी प्रचार कालावधी मिळाल्याने अगोदरच उमेदवारांना सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येत होत्या. सध्या प्रचाराची यंत्रणा बघितली, तर कार्यकर्त्यांनीच नियोजन हाती घेत काम सुरू केले आहे.सांगलीतील काँग्रेस कमिटीत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचे कार्यालय असले तरी, कमिटीबरोबरच सांगली-मिरज मार्गावर असलेल्या पाटील यांच्या निवासस्थानामधूनही प्रचारयंत्रणा राबविण्यात येत आहे. प्रचारासाठीचे साहित्य प्रत्येक गावात, प्रभागात पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन बिपीन कदम यांच्याकडे आहे. त्यांच्याबरोबरच शहरातील प्रचाराचे नियोजन नगरसेवक अभिजित भोसले पाहत आहेत, तर स्वत: पृथ्वीराज पाटील यांच्या दिवसभरातील कार्यक्रमांचे नियोजन मेहबूब मुतवल्ली करत आहेत.
सोशल मीडियाचीही जबाबदारी कार्यकर्त्यांवरच आहे. सोशल मीडियावरील प्रचारासह प्रभागनिहाय बैठका, कोपरा सभा, जाहीर सभा, महिला मेळाव्याचेही नियोजन करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील प्रचारासाठी वॉररूम सज्ज करण्यात आली आहे.भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचाराचे नियोजन बापट मळा परिसरातील पक्षाच्या कार्यालयातून होत आहे. याशिवाय विश्रामबाग येथील संपर्क कार्यालयातही कार्यकर्त्यांचा राबता कायम असतो. भाजपकडूनही प्रचाराचे साहित्य उपलब्ध झाले असून, सभा, पदयात्रेवेळी ते कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
भाजपच्या प्रचाराचे नियोजन शरद नलवडे पाहत आहेत. त्यांच्यासोबत नगरसेविका भारती दिगडे, किरण भोसले, अविनाश मोहिते यांनी नियोजन केले आहे. शेखर इनामदार, नीता केळकर यांचाही नियोजनात सक्रिय सहभाग असतो.