आर.आर.नी बेकायदा प्रतिज्ञापत्र दिलसंजय पाटील : निवडणूक आयोग, राज्यपालांकडे तक्रार करणारेसांगली : माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून चार तासात बेकायदेशीररित्या नवीन प्रतिज्ञापत्र सादर केले. त्याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे असून, राज्याचे निवडणूक आयुक्त, राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याची माहिती भाजपचे खासदार संजय पाटील यांनी आज (बुधवारी) पत्रकार बैठकीत दिली. तासगावचे निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांना निलंबित करून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले की, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात उमेदवारी अर्ज छाननीवेळी आर. आर. पाटील यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. आम्हाला चर्चेत अडकवून त्यांनी चार तासांत कागदपत्रे बदलली. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बेळगावमधील गुन्ह्याचा उल्लेख नव्हता. या १४ पानी प्रतिज्ञापत्रासोबत त्यांनी आणखी दोन पानाचे प्रतिज्ञापत्र बेकायदेशीररित्या दाखल केले. याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळेच राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना यासंदर्भातील कागदपत्रे पाठविली आहेत. सोमय्या निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यापूर्वीही माझ्याविरोधात आर. आर. पाटील यांनी महसूल व पोलीस यंत्रणेवर दबाव आणून निवडणुका जिंकल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठीही त्यांनी महिनाभर आधी प्रांताधिकारी हेमंत निकम यांना सांगली जिल्ह्यात आणले. निकम यांच्या कार्यपद्धतीची चौकशी व्हावी व त्यांना निलंबित करावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. जबाबदार अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांसारखी वागणूक देऊन निवडणूक जिंकण्याचा धंदा बंद पाडू.आर. आर. पाटील यांनी समाजा-समाजात भांडणे लावून राजकीय पोळी भाजून घेतली आहे. तर आ. प्रकाश शेंडगे यांना भाजपने आमदारकी दिली, पदे दिली, आता ते पक्षावर टीका-टिप्पणी करीत आहेत. लोकसभा निवडणुकीतील गद्दारीमुळेच शेंडगेंचा पत्ता कट झाला, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)माझ्या बंडखोरीमागे कोणाचा हात नाही--मुन्ना कुरणे : उमेदवारीबाबत अन्याय सांगली : माझ्या बंडखोरीमागे कोणत्याही नेत्याचा किंवा पक्षाचा हात नाही. पाचवेळा विधानसभेसाठी उमेदवारी मागूनही ती मिळाली नाही. त्याच चेहऱ्यांना प्रत्येकवेळी उमेदवारी दिली जात असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळेच अपक्ष म्हणून मी निवडणूक लढवत आहे, अशी भूमिका कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली. ते म्हणाले की, अल्पसंख्याक समाजाला नेहमीच डावलले जाते. ठराविक समाजाचे मी प्रतिनिधीत्व करीत नाही. महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मला सर्वच समाजाच्या लोकांनी निवडून दिले होते. त्यामुळे केवळ एका धर्मापुरता, समाजापुरता संकुचित विचार घेऊन मी निवडणूक लढवत नाही. गेली ३५ वर्षे कॉँग्रेसशी एकनिष्ठ राहूनही नेत्यांकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. उमेदवारी सातत्याने डावलली गेली. जिल्ह्यातील नेत्यांनी ताकद लावून मला उमेदवारीपासून बाजूला ठेवले. त्यामुळेच मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. अनेकांना मी माघार घेईन, असे वाटले होते. अन्य मतदारसंघातील बंडखोरांवर दबाव न आणता केवळ माझ्यावरच दबाव आणला गेला. तरीही त्याला बळी न पडता मी अर्ज ठेवला आहे, असेही कुरणे यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सर्वच आठ मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांत आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपने एकमेकांवर टीका-टिप्पणी करीत वातावरण तापविण्यास सुरुवात केली. बुधवारी भाजपचे खासदार संजय पाटील यांनी पुन्हा एकदा माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना टार्गेट केले. तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मुन्ना कुरणे यांनी थेट पक्षश्रेष्ठींवर शिरसंधान साधले. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी आपली भूमिका मात्र गुलदस्त्याच ठेवली आहे. उद्या गुरुवारपासून प्रचारात रंग भरणार आहे.
सांगली जिल्ह्यात रंगली राजकीय धुळवड
By admin | Published: October 01, 2014 11:18 PM