अशोक पाटील ।इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक व राजवर्धन यांनी वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्यदिव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. हे आयोजन म्हणजे चर्चेत राहण्याचा अनोखा फंडाच आहे. परंतु जयंत पाटील यांचा राजकीय वारसदार कोण होणार? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.
वाळवा—शिराळा तालुक्यात राजकीय नेत्यांच्या वारसदारांची रेलचेल सुरु आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून सागर खोत यांची निवड केली आहे. त्यांनी रयत अॅग्रोच्या माध्यमातून आपला संपर्क मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रभर ठेवला आहे. सद्यस्थितीला आमदार जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून सदाभाऊ खोत यांच्याकडेच पाहिले जात आहे.
मंत्री सदाभाऊ खोत यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात भाजपचे वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून त्यांनी भव्य प्रमाणात राज्यपातळीवरील कबड्डी स्पर्धा भरवून युवकांना आकर्षित केले. यानंतर लगेचच कृषी प्रदर्शन भरवून शेतकºयांमध्ये आपली प्रतिमा उजळवून घेतली.मंत्री खोत यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीही सरसावली आहे. आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य अशा नोकरी मेळाव्याचे शनिवार दि. ९ रोजी आयोजन करण्यात आले आहे. तसेच आष्ट्यात होणारे कृषी प्रदर्शन इस्लामपुरात घेण्याचेही नियोजन सुरु आहे.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आमदार जयंत पाटील यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक व राजवर्धन या दोघांवर सोपविले आहे. ही वाटचाल म्हणजे आगामी विधानसभेची रंगीत तालीम आहे. जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद असल्याने त्यांना राज्यभर फिरावे लागणार आहे. त्यामुळे मतदारसंघात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी खात्रीचे कोणी तरी असणे गरजेचे असल्यानेच, आ. पाटील यांनी दोन्ही मुलांवर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
गत दोन वर्षांपासून दोन्ही मुलांनी या ना त्या कारणाने आपला मतदारसंघात संपर्क ठेवला आहे. नोकरी मेळाव्यातून युवकांना आकर्षित करण्याचा नवीन फंडा राष्ट्रवादीने काढला आहे. याला राजकीय यश किती मिळते, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.राजवर्धनच राजकीय वारसदार..!राजारामबापू पाटील यांच्या अकाली निधनानंतर परदेशात शिक्षणासाठी गेलेले धाकटे चिरंजीव जयंत पाटील यांना राजकारणात यावे लागले. जयंतरावांचे सर्वच राजकीय गुण धाकटे चिरंजीव राजवर्धन यांच्यात दिसून येतात. त्यामुळे आगामी राजकारणात जयंतरावांचे राजकीय वारसदार म्हणून राजवर्धन यांचे नाव पुढे आल्यास वावगे ठरणार नाही.
जयंत नक्षत्र, जयंत पॅकेज, जयंत नीती आणि विरोधकांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम या उपमा राजकीय पटलावर गाजलेल्या आहेत. आता सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासाठी ‘जयंत नोकरी मेळावा’ हा नवीन फंडा राजकीय बाजारात आला आहे. यापूर्वी शिराळा येथे महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांनीही नोकरी मेळावा भरवून शक्तिप्रदर्शन केले होते.