लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात कोरोनाची दररोजची रुग्णसंख्या दोनशेवर आहे. मृत्युदरही वाढला आहे. या परिस्थितीत आरोग्यसेवेतून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. पालकमंत्री जयंत पाटील आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यातील हा संघर्ष वेगळ्या वळणावर आला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वच लोकप्रतिनिधी, सामजिक संघटना, रुग्णालयांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. पालकमंत्री जयंत पाटील यांनी टाटांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर उभे केले, तर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही प्रकाश हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू केले. शहरात चार खासगी रुग्णालयांना कोविड सेंटरची मान्यता दिली. पहिल्या लाटेत सुरुवातीला सेवाभावी वृत्तीने उपचार झाले.
दुसऱ्या लाटेत सुरुवातीपासूनच सेवाभावी संकल्पना संपुष्टात आली. रुग्णसंख्या वाढली. शहरी भागात बेड मिळणे मुश्कील झाले. काही लोकप्रतिनिधींनी काही डॉक्टरांना हाताशी धरून कोविड रुग्णालयात भागीदारी सुरू केली. येथेच राजकीय ठिणगी पडली. त्यानंतर मृत्युदर वाढला म्हणून पालकमंत्री जयंत पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांना टिपले आणि उपजिल्हा रुग्णालयासमोर कोविड सेंटर उभे करण्याची घोषणा केली. त्यानंतर प्रकाश हॉस्पिटलमध्ये बेडवाढीच्या मंजुरीत जयंत पाटील अडसर आणत असल्याचा आरोप नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केला. त्यामुळे धुमसणारा संघर्ष पेटला. नुकताच बिल आकारणीवरून जयसिंगपूर येथील रुग्णाच्या नातेवाइकांनी प्रकाश हॉस्पिटलविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. यामध्येही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप नगराध्यक्ष पाटील यांनी केला.
शहरातील मृत्युदर वाढला असताना आरोग्य सुविधेवरून राजकारण पेटले असून, सर्वसामान्य रुग्ण मात्र संकटात आहेत.
फोटो : जयंत पाटील, निशिकांत पाटील