फोटो -२१०६२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज
बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटातील संस्थापक पॅनलला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत.
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : ‘कृष्णे’च्या निवडणुकीत वाळवा-शिराळा तालुक्यातील सर्वच नेत्यांना आपल्या पक्षनिष्ठेचा विसर पडला आहे. तिन्ही पॅनलचे प्रमुख सत्तेसाठी कृष्णा खोऱ्यात पायपीट करत आहेत. पॅनल प्रमुखांनी कोपरा सभा, गाठी-भेटींवर भर दिला आहे. या दौऱ्यात स्थानिक कार्यकर्ते आणि सभासद पक्षीय अंतर्गत संघर्ष विसरून कृष्णेच्या रणांगणात विखुरले आहेत.
‘कृष्णे’च्या कार्यक्षेत्रात इस्लामपूर मतदार संघातील बोरगाव, रेठरे हरणाक्ष, बहे, हुबालवाडी, मसुचीवाडी, गौंडवाडी आणि या गावांतर्गत येणाऱ्या वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटात काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील (बोरगाव) हे सहकार पॅनलचे उमेदवार आहेत तर संजय पाटील (इस्लामपूर), जे. डी. मोरे (रेठरे हरणाक्ष), जयश्री पाटील (बहे), अविनाश खरात (खरातवाडी) हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. त्यांच्या प्रचारात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन एकदिलाने प्रचार करत आहेत. अशीच अवस्था या गटात संस्थापक पॅनलची आहे. शिवाजी पवार (इस्लामपूर) हे एकमेव राष्ट्रवादीविरोधी उमेदवार आहेत. महेश पवार (रेठरे हरणाक्ष), उदयसिंह शिंदे (बोरगाव), मिनाक्षीदेवी दमामे (बहे) हे राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली कार्यरत आहेत. या सर्वांनाच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी पाठिंबा दिला आहे तर त्यांच्या प्रचारात राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचे कार्यकर्ते आहेत.
रयतमधून इस्लामपुरात राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक आनंदराव मलगुंडे उमेदवार आहेत. त्यांच्याबरोबर विश्वासराव मोरे-पाटील (रेठरे हरणाक्ष), विवेकानंद मोरे (रेठरे हरणाक्ष), सत्वशीला थोरात (बहे) हे राष्ट्रवादी पक्षांतर्गत असले तरी त्यांना काॅंग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी थेट पाठिंबा देऊन ते स्वत: प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. रयतमध्ये काॅंग्रेस-राष्ट्रवादीत सलोखा असल्याचे दिसते. इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तटस्थ भूमिका घेतली असली तरी दुसऱ्या फळीतील सर्वच नेते पक्षनिष्ठा विसरून तिन्ही पॅनलमधून प्रचार करत आहेत. या मतदार संघातील तिन्ही पॅनलच्या प्रचाराच्या भित्तीपत्रकावर राजारामबापू पाटील, नानासाहेब महाडिक आणि पॅनल प्रमुखांच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोटो वापरले आहेत.
शिराळा मतदार संघातील नेर्ले-तांबवे गटात जयंत पाटील यांचे स्नेही संभाजी पाटील (नेर्ले), लिंबाजी पाटील (तांबवे) हे जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. तर याच गटातून इंदुमती जाखले या महाडिक गटाच्या आहेत. नेर्ल्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांना एका मंचावर आणले आहे. त्यामुळे येथील कार्यकर्ते पक्षीय विचार न करता सहकार पॅनलचा प्रचार करत आहेत. तर रयत पॅनलकडून जयंत पाटील यांचेच स्नेही प्रशांत पाटील (नेर्ले) यांची नेहमीच राष्ट्रवादीविरोधी भूमिका असते. परंतु, त्यांच्या जोडीला प्रा. अनिल पाटील (कामेरी) हे जयंत पाटील समर्थक आहेत. संस्थापकमधून सुभाष पाटील (नेर्ले) यांना उमेदवारी दिली आहे. या गटातील राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीविरोधी असणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून प्रचाराचा धुमधडाका सुरू केला आहे. शिराळा मतदार संघातील कासेगाव, वाटेगाव, नेर्ले, तांबवे, पेठ, कामेरी येथील दुसऱ्या फळीतील नेते अंतर्गत संघर्ष बाजूला ठेवून ‘कृष्णे’च्या निवडणुकीत उतरले आहेत.