अशोक पाटील- इस्लामपूर -लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी केंद्रीय कृषिमंत्रीपदाची स्वप्ने पाहिली. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवाजीराव नाईक यांनी, लाल दिवा मिळणारच, अशा खात्री असल्याने मुंबई वाऱ्या केल्या. सदाभाऊ खोतही मंत्रीपद मिळणारच, अशा वल्गना करत होते. तथापि अपेक्षा फोल ठरल्या. या तिन्ही नेत्यांकडे सक्षम संस्था नाहीत, परंतु राज्यात त्यांची सत्ता आहे. याउलट राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे सक्षम संस्था आहेत, पण सत्ता नसल्याने त्यांच्या भोवतालची गर्दी कमी झाली आहे. सध्या तरी अशी परिस्थिती असल्याने वाळवा-शिराळ्यात राजकीय अस्वस्थता आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी ऊस दरासंदर्भात एक पाऊल मागे घेतल्याचे चित्र आहे. याचा फायदा जिल्ह्यातील साखरसम्राटांनी घेतला आहे. १९०० रुपयांवर कोणीही पहिला हप्ता दिलेला नाही. यामुळे शेट्टी आणि खोत यांची लोकप्रियता घसरत चालली आहे. शिवाजीराव नाईक यांनी विधानसभेपूर्वी मिळविलेल्या लोकप्रियतेवर विजय खेचून आणला आहे. गत हंगामात नाईक यांनी गूळ पावडर व साखर तयार करणारा शिवाजी केन प्रोसेसर्स हा कारखाना सुरू केला आहे. मात्र इतर कारखाने देतील तो दर आम्ही देऊ, असाच पवित्रा त्यांनीही घेतला असून, ऊस उत्पादकाला तेही न्याय देऊ शकलेले नाहीत. याउलट ज्या-ज्या गावात शिवाजीराव नाईक यांना जास्त मते मिळाली आहेत, त्या त्या गावातील ऊस उत्पादकांवर मानसिंगराव नाईक यांच्या विश्वास साखर कारखान्याचे प्रशासन अन्याय करीत असल्याची चर्चा आहे. यामुळे दोन्ही गटात अस्वस्थता आहे.मंत्रीपद मिळविण्यासाठी शिवाजीराव नाईक यांनी अनेक मुंबई वाऱ्या केल्या आहेत. आतापर्यंत तीनवेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, परंतु नाईक यांच्या पदरी वेळोवेळी निराशाच पडली आहे. त्यामुळे त्यांच्या गटात अस्वस्थता आहे.दुसरीकडे माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या सर्व संस्था सक्षमपणे सुरू आहेत. त्यांनी आता संस्था आणि मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी सत्तेवर असताना पाटील यांनी सोशल मीडियाला फारसे जवळ केले नव्हते, परंतु सोशल मीडियामुळेच भाजप सत्तेवर आला आहे, असे मत खुद्द त्यांनीच व्यक्त केले आहे. त्यामुळे सध्या ते मीडियाच्या संपर्कात राहून अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत.तथापि मंत्रीपद नसल्याने त्यांच्याकडील सर्वसामान्यांचा ओढा कमी झाल्याचे दिसत आहे. यामुळेच वाळवा व शिराळा तालुक्यात राजकीय अस्वस्थता असल्याचे चित्र आहे.मंत्रीपद मिळविण्यासाठी शिवाजीराव नाईक यांनी अनेक मुंबई वाऱ्या केल्या आहेत. आतापर्यंत तीनवेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, परंतु नाईक यांच्या पदरी वेळोवेळी निराशाच पडली आहे. त्यामुळे त्यांच्या गटात अस्वस्थता आहे.सदाभाऊ खोतही मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा धरून आहेत. परंतु, त्यांना संधी मिळाली नसल्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते नाराज आहेत.
वाळवा-शिराळ्यात राजकीय अस्वस्थता
By admin | Published: January 08, 2015 11:09 PM