सचिन लाड --सांगली --स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाची खातेफोड करून एकाच कार्यालयात दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाने पोलिस दलात छुप्या पद्धतीने रंगलेल्या राजकारणाची चर्चा पुन्हा उफाळली आहे. विभागाअंतर्गत विभाग स्थापण्याच्या संकल्पनेतून नाराजी, गटबाजी आणि रुसवा-फुगवीचा खेळ अप्रत्यक्षरित्या रंगण्याची चिन्हे आहेत. कामाच्या सोयीचा मुलामा या निर्णयाला लावला असला तरी, पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत राजकीय चर्चेलाच उधाण आले आहे. सध्याचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या जोडीला जतचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांची नियुक्ती केली आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण हा महत्त्वाचा विभाग आहे. जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात या विभागाची कामगिरी नेहमीच नजरेत भरण्यासाठी राहिली आहे. दोन वर्षापूर्वी लाचखोरीचे प्रकरण घडल्यानंतर या विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. कर्मचारी धाडसाने काम करण्यास तयार नव्हते. त्यावेळी खमक्या अधिकाऱ्याची गरज होती. तेवढ्यात घनवट यांची जिल्ह्यात ‘एन्ट्री’ झाल्याने सावंत यांनी त्यांची नियुक्ती केली होती. पोलिस निरीक्षक घनवट यांना येथील पद्भार स्वीकारून दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दिलीप सावंत यांनी त्यांना त्यांचे पूर्वीचे काम पाहून या विभागाची जबाबदारी सोपविली होती. ती त्यांनी आतापर्यंत यशस्वीपणे पार पाडली आहे. घनवट यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला आहे. मनोज मानेचा खून करून पोलिसांना महिनाभर सळो-की-पळो करून सोडलेल्या गुंड म्हमद्या नदाफला पकडले. इस्लामपुरातील डॉक्टर दाम्पत्याचा खून असो अथवा अन्य कोणत्याही गुंतागुंत व आव्हानात्मक गुन्ह्यांचा त्यांनी छडा लावला. पोलिस ठाणे जिथे कमी पडेल तिथे ते नेहमीच धावत गेले आहेत. पण पहिल्यांदाच या विभागाचे दोन तुकडे पाडल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.प्रतिबंधात्मक कारवाई व गुन्हे प्रगटीकरण असे दोन विभाग केले आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई घनवट यांच्याकडे, तर नव्याने विभाग केलेल्या गुन्हे प्रगटीकरणची जबाबदारी जतचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्याकडे सोपविली आहे. या नियुक्त्यांमागे मोठे राजकारण घडले असल्याची चर्चा रंगली आहे.घनवट एक्स्प्रेस सुसाटगतवर्षी आ. जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीचा व अनेक गुन्ह्यांचा छडा लागला नसल्याचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती. त्यानंतर वाळवा तालुक्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याची जबाबदारी घनवट यांच्याकडे सोपविण्यात आली होती. घनवट यांनीही गेल्या सहा महिन्यात तेथील एकही गुन्हा प्रलंबित ठेवला नाही. रुसवा-फुगवीचा खेळ एलसीबीचे दोन विभाग केल्याने रुसवा-फुगवीचा खेळ रंगण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांमध्ये वादाचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. कोणत्या विभागात कोण काम करणार? घनवट व पिंगळे कोणत्या कर्मचाऱ्यांची निवड करणार? यावरुनही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. गटबाजीला उधाण येण्याची शक्यता आहे. यातून कामांनाही ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
‘एलसीबी’च्या पडद्याआड रंगलं पोलिसी राजकारण!
By admin | Published: May 02, 2016 11:43 PM