अनेक बऱ्या-वाईट घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेले २०१४ हे वर्ष काही दिवसात काळाच्या पडद्यआड कायमचे लुप्त होत आहे. नव्या वर्षाच्या उदरात नक्की काय लपले आहे, याचा अंदाज बांधणे तर अशक्यच; परंतु तरीही नवा सूर्य आशेचे, उत्साहाचे किरण घेऊन येईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. प्रत्येक क्षेत्रात जे घडले त्याच्याकडे मागे वळून पाहताना काय घडायला हवे होते व ते का घडले नाही, याचा लेखाजोखा मांडण्याचा ‘लोकमत’चा हा प्रयत्न..!सांगली : जिल्ह्याच्या राजकारणाचे रंग आणि समीकरणे बदलण्याचे काम सरत्या वर्षाने केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का देत भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यातच दोन्ही काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये उडी मारून राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याच्या राजकारणाचा बदललेला हा प्रवाह आता कोणत्या दिशेने जाणार, हा नव्या वर्षातील उत्सुकतेचा विषय असणार आहे. वर्षाची सुरुवातच लोकसभेच्या निवडणूक वातावरणाने झाली. लोकसभेच्या इतिहासात सांगली हा काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला समजला जात होता. या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची भीष्मप्रतिज्ञा भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सांगलीत केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हीच प्रतिज्ञा अधोरेखीतही केली. मोदी लाटेचा परिणाम सांगलीत होणार नाही, असा आत्मविश्वास काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेही व्यक्त करीत होते. लोकसभेच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांत न घडलेला दोन्ही काँग्रेसच्या मनोमीलनाचा प्रयत्न यशस्वी झाला. दोन्ही काँग्रेसचे नेते एकत्रितपणे काम करू लागले. पण दोन्ही काँग्रेसने पाळलेला आघाडी धर्म जिल्ह्यातील निकालावर परिणाम करू शकला नाही. मोदी लाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा दारुण पराभव झाला. हातकणंगले मतदारसंघातूनही काँग्रेसला पराभूत व्हावे लागले.लोकसभेचाच कित्ता पुन्हा विधानसभेला गिरविला गेला. सांगली जिल्ह्यात तब्बल चार जागा जिंकून भाजप जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. अनिल बाबर यांच्यारूपाने शिवसेनेने जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच याठिकाणी खाते उघडले. राष्ट्रवादीला दोन, तर काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. याला अनेक कारणेही होती. जिल्ह्यातील अर्धा डझन नेते राष्ट्रवादी व काँग्रेस सोडून भाजपमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे विधानसभेत भाजपला अनपेक्षित यश मिळाले. खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख आदी नेत्यांनी भाजपमध्ये, तर अनिल बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या दोन्ही पक्षांची ताकद वाढली. भाजप, स्वाभिमानीच्या लोकांनीही तिकिटासाठी शिवसेना व अन्य पक्षात उड्या मारल्या. राज्यातील सत्ता बदलामुळेही गेल्या अनेक वर्षांत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेतेमंडळींची यंदा राजकीय गोची झाली. एकूणच राजकारणाचे रंग व राजकारणाचा प्रवाहच बदलणारे हे वर्ष ठरले. (प्रतिनिधी)दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का लोकसभेला वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील आणि विधानसभेला मदन पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे वसंतदादा घराण्याच्या अस्तित्वाबद्दचा प्रश्न निर्माण झाला. खानापूरमधून सदाशिवराव पाटील, तासगाव-कवठेमहांकाळमधून अजितराव घोरपडे, शिराळ््यातून मानसिंगराव नाईक, कडेगावमधून पृथ्वीराज देशमुख, जतमधून प्रकाश शेंडगे आदी दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला.लाल दिवा गेलागेल्या अनेक वर्षांपासून मंत्र्यांची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्याला प्रथमच मंत्रीपदापासून वंचित रहावे लागले. लाल दिवा येईल, या अपेक्षेने भाजपचे नेते प्रयत्न करीत होते. प्रत्यक्षात परंपरेत खंड पडला आणि जिल्हा लाल दिव्यापासून वंचितच राहिला.