दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामुळे वाॅर्ड नंबर एक, दोन व सहासाठी मंजूर झालेल्या ३ कोटी ५ लाखांच्या निधीवरून सध्या श्रेयवादाचे राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. सत्ताधारी शिवसेना व विरोधक भाजप यांच्या श्रेयवादाची चर्चा दिघंचीत चांगलीच रंगू लागली आहे.
या योजनेतून दोन टाक्या बांधल्या जाणार आहेत. यामुळे दिघंचीतील चाळीस वाड्या-वस्त्यांना याचा फायदा होणार आहे. सुमारे २७०० कुटुंबांना पिण्यासाठी पाणी मिळणार असल्याने हा भाग कायमस्वरूपी टँकरमुक्त होणार आहे. तर या योजनेतून माणसी ५५ लिटर पाणी प्रतिदिवस मिळणार आहे. या योजनेच्या श्रेयवादाची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
सरपंच अमोल मोरे म्हणाले की, ही योजना कोणत्या योजनेतून मंजूर झाली, याची माहिती घ्यावी. केवळ श्रेयवादासाठी प्रसिध्दी मिळवणाऱ्यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी. वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांची तहान भागवणे यासाठीच आमचे प्राधान्य आहे. आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील यांच्यामुळेच ही योजना मार्गी लागली आहे.
याला उत्तर देताना ग्रामपंचायत सदस्य केशवराव मिसाळ म्हणाले की, खासदार संजयकाका पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख व हर्षवर्धन देशमुख यांच्यामुळेच ही योजना मार्गी लागली आहे. योजनेसाठी आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. ही योजना मंजूर होत नाही, असे दोन महिन्यांपूर्वी म्हणणाऱ्या अल्प मतातील सरपंचांनी याचे श्रेय घेऊ नये. ही योजना मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व सदस्य व कार्यकर्त्यांनी सतत पाठपुरावा केला आहे.
चौकट
नागरिकांना दिलासा
राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी ३ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यावरून दिघंचीत श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. मात्र दिघंचीमधील वाॅर्ड नंबर एक, दोन व सहामधील ४० वाड्या-वस्त्या टँकरमुक्त होणार असून, येथील नागरिकांना दिलासा मिळणार आहे