अशोक पाटील-- इस्लामपूर---यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे वाळवा, शिराळा तालुक्यातील काही गावांना पाण्याची कमतरता भासत आहे. १९७२ च्या दुष्काळानंतर या तालुक्यांवर पहिल्यांदाच पाण्याचे संकट आले आहे. मात्र या दुष्काळाचे राजकारण शिराळा तालुक्यातील नेत्यांनी पेटवले असून, शेतकऱ्यांपेक्षा श्रेयवादालाच महत्त्व दिले जात आहे. त्यातच आता दोन्ही तालुक्यावर अंकुश ठेवणारे आमदार जयंत पाटील यांनाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.वारणा, कृष्णा खोऱ्यात वसलेल्या वाळवा, शिराळा तालुक्यातील बहुतांशी गावे सुलजाम् सुफलाम आहेत, तर पूर्वेकडील तालुक्यांत दुष्काळाची स्थिती असते. यावर्षी मात्र शिराळा, वाळवा तालुक्यांत दुष्काळाची स्थिती उद्भवली असताना येथील लोकप्रतिनिधींनी स्वत:चे अस्तित्व व श्रेयवादासाठी दुष्काळाचे राजकारण सुरू केले आहे. मोर्चा, आंदोलन, निवेदन देऊन यावर नेमके काय साध्य होणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांतून व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी एकत्र येऊन या प्रश्नावरून आमदार शिवाजीराव नाईक यांना ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न चालवला आहे.आमदार शिवाजीराव नाईक यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाळवा, शिराळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचे फेरसर्वेक्षण करून नवीन यादी जाहीर करावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे.राज्याच्या राजकारणात पूर्वीपासून सांगली जिल्ह्याचा ठसा उमटत आला आहे. राजकीय श्रेयवादासाठी हा जिल्हा आघाडीवर आहे. शिराळा तालुक्यात होणाऱ्या धरणाचा वाद वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यात रंगला होता. अलीकडील काळात वाकुर्डे योजनेचे श्रेय घेण्यासाठी शिराळा, वाळवा तालुक्यातील नेत्यांत स्पर्धा लागली आहे. आता दुष्काळाबाबतही सर्वच नेत्यांनी श्रेयवादासाठी राजकीय फड रंगवला आहे.हेच नेते निवडणूक लढवताना कोट्यवधी रुपयांचा चुरडा करतात. यातील काही भाग दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला तरी वाळवा-शिराळ्यात दुष्काळाच्या झळा जाणवल्या नसत्या. दुष्काळावरून सध्या सुरू असलेले रणकंदन हे फक्त नेत्यांच्या राजकीय अस्तित्वासाठीच असल्याची चर्चा शेतकऱ्यांतून आहे.स्वाभिमानीची चुप्पी : मंत्रीपदाची अपेक्षाभाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते दुष्काळाच्या मदतीसाठी भांडत आहेत, तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत मंत्रीपदाच्या अपेक्षेमुळे गप्प आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी फक्त उसाच्या एफआरपीवर बोलण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या तोंडातून दुष्काळावर ‘ब्र’ही निघालेला नाही, हे विशेष!
दुष्काळावरून राजकारण पेटतेय..!
By admin | Published: October 27, 2015 11:23 PM